सीमा हैदरला पाकिस्तानकडून मोठा दणका! कुटुंबीयांबाबत आली महत्त्वाची अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:18 IST2023-07-19T16:09:51+5:302023-07-19T16:18:09+5:30
सीमा हैदरची उत्तर प्रदेश एटीएसकडून सलग दोन दिवस चौकशी

सीमा हैदरला पाकिस्तानकडून मोठा दणका! कुटुंबीयांबाबत आली महत्त्वाची अपडेट
Seema Haider Pakistan: सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला आणि ग्रेटर नोएडामधील तिचा भारतीय जोडीदार सचिन मीना हे सध्या चर्चेत आहेत. सचिनसोबत राहणाऱ्या सीमा हैदरच्या अडचणी पाकिस्तानमध्येही वाढल्या आहेत. तिथे सीमाच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, सीमाच्या कुटुंबीयांना मीडियाशी बोलण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. सीमाची दोन्ही लहान मुले सिंधीऐवजी हिंदी का बोलतात, याचाही तपास सुरू आहे. सीमाने पाकिस्तानी पती गुलामशी बळजबरीने लग्न केल्याचे सांगितले, मात्र पाकिस्तानमधील तपासात सीमाने गुलामला लग्नाआधी फोन केल्याचे समोर येत आहे. सीमाच्या सासरच्यांनी 10 मे रोजी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. याच दरम्यान आता तिच्या कुटुंबीयांना मिडियाशी बोलण्यापासून रोखण्यात आले आहे, तसेच कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी सीमा हैदरबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. सीमाने मार्चमध्ये FlyDubai FZ336 या फ्लाइटने पहिल्यांदा प्रवास केला. दुसऱ्यांदा तिने 10 मे रोजी एअर अरेबिया फ्लाइट G9542 ने आपल्या मुलांसोबत प्रवास केला. मात्र, याआधी विमान प्रवासाची नोंद सापडलेली नाही.
उत्तर प्रदेशएटीएसने सीमा हैदरची केली चौकशी
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरची चौकशी केली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएसने सीमाचा साथीदार सचिनला चौकशीसाठी सोबत घेतले. अधिकाऱ्याने सांगितले की, दोघांना ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागातील त्यांच्या राहत्या घरातून सकाळी ८ वाजता नोएडा येथील एटीएस युनिट कार्यालयात आणण्यात आले, जिथे संध्याकाळपर्यंत चौकशी सुरू होती. उत्तर प्रदेश एटीएसने सोमवारी प्रथमच सीमा आणि सचिन यांची नोएडा येथील कार्यालयात चौकशी केली आणि रात्री 10.30 वाजता त्यांना घरी पाठवले.
यूपी एटीएसच्या चौकशी प्रक्रियेचे स्पष्टीकरण देताना, एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील प्रकरणातील चौकशीच्या निकालानुसार या जोडप्याला अटक केले जाऊ शकते की नाही हे स्पष्ट होईल. परदेशी कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्याचा स्थानिक पोलीस स्वतंत्रपणे तपास करत असून अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही.