सीमा हैदरच्या जीवाला धोका; सचिन आणि मुलांसह सेफ हाउसमध्ये केले शिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:08 IST2023-07-19T15:03:59+5:302023-07-19T15:08:47+5:30
Seema Haider : सीमा आणि तिला कुटुंबाला धोका पोहोचू शकतो, अशी माहिती गुप्तचरांना मिळाली आहे, यानंतर तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

सीमा हैदरच्या जीवाला धोका; सचिन आणि मुलांसह सेफ हाउसमध्ये केले शिफ्ट!
गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर आणि सचिन मीना, ही दोन नावे चर्चेत आहेत. PUBG गेमद्वारे दोघे प्रेमात पडले आणि सचिनसाठी पाकिस्तानी सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. ती सचिनसोबत ग्रेटर नोएडात राहू लागली, पण पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून, सोबतच राहत आहेत. दरम्यान, सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याने तिला सेफ हाउसमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
सीमा आणि तिला कुटुंबाला धोका पोहोचू शकतो, अशी माहिती गुप्तचरांना मिळाली आहे, यानंतर तिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या सीमासोबत तिची ४ मुले आणि सचिन आहे. दोन दिवस उत्तर प्रदेश एटीएस सीमाची चौकशी करत होती. सीमाची दोन दिवसांत तब्बल १८ तास चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचरांना मिळालेल्या माहितीनुसार सीमा हैदरच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षित पोलीस क्वार्टरमध्ये हलवण्यात आले आहे. सध्या याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही.
याचबरोबर एटीएसच्या चौकशीदरम्यान सीमाकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली आहे. एटीएसने सीमाला अनेक प्रश्न विचारले आहेत. दरम्यान, ती सांगत असलेली माहिती खरी आहे की तिच्या यामागे आणखी काही आहे, अशी शंका तिच्यावर सुरुवातीपासूनच उपस्थित होत आहे. सीमाची पाकिस्तानी कागदपत्रेही सोमवारी समोर आली होती, ज्यामध्ये तिचे वय वेगळे दाखवण्यात आले होते. तर सीमाने आपले वय वेगळे सांगितले होते. पाकिस्तानी आय-कार्डवर सीमाची जन्मतारीख 2002 अशी लिहिली होती, तर सीमाने आधी वेगळी तारीख दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने सीमाची बराच वेळ चौकशी केली असता तिला अनेक प्रश्न विचारले. एका प्रश्नात सीमाला विचारण्यात आले की ती पाकिस्तानी गुप्तहेर आहे का, तर सीमाने त्याचा साफ इन्कार केला. आता एटीएसही तिच्या पाकिस्तानी कागदपत्रांचा शोध घेण्यामध्ये गुंतली आहे. तसेच तिचा पाकिस्तानी लष्कराशी काय संबंध? कारण सीमाचा भाऊ आणि काका पाकिस्तानी लष्करात असल्याची माहिती समोर आली आहे.