...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 07:39 PM2024-03-17T19:39:12+5:302024-03-17T19:39:36+5:30

मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे.

Samajwadi Party President Akhilesh Yadav has written a letter to Congress leader Rahul Gandhi as he was unable to attend the All India Aghadi meeting in Mumbai  | ...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र

...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र

आज मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते या सभेसाठी उपस्थित आहेत. काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली. आज या यात्रेचा बहुचर्चित अशा सभेने समारोप होत आहे. या सभेसाठी देशभरातील इंडिया आघाडीतील प्रमुख नेते मुंबईत आले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील येणार होते. मात्र, ते येऊ न शकल्याने त्यांनी राहुल गांधी यांना पत्राद्वारे संदेश दिला आहे. 

अखिलेश यादव म्हणाले की, आज मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होत आहे. असा प्रवास करू शकणारे फार कमी लोक असतात. राहुल गांधी तुमच्या संकल्पासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. भाजप सरकारच्या अपयशामुळे धगधगत असलेल्या मणिपूरपासून तुम्ही या प्रवासाला सुरुवात केली. ईशान्येतून तुम्ही हुकूमशाही सरकारविरोधात जोरदार संदेश दिला. या संपूर्ण प्रवासात तुम्ही शेतकरी, तरुण, महिला, ज्येष्ठांसह समाजातील प्रत्येक घटकाला भेटला आहात, त्यांच्या समस्या तुम्ही मांडल्या.

तसेच निवडणूक आयोगाने काल निवडणुका जाहीर केल्या, २० मार्चपासून उत्तर प्रदेशमध्ये नामांकन सुरू होत आहे, त्याच तयारीमुळे मी यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. शेतकरी, तरुण, मागास, दलित आणि महिला विरोधी असलेल्या भाजपला जनता या निवडणुकीत उखडून टाकेल, अशी आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल यातच या यात्रेचे खरे यश असेल, असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले.

Web Title: Samajwadi Party President Akhilesh Yadav has written a letter to Congress leader Rahul Gandhi as he was unable to attend the All India Aghadi meeting in Mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.