राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 22:25 IST2024-01-01T22:19:26+5:302024-01-01T22:25:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे.

राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी
प्रयागराज - देशभरात २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात अयोध्येतील पवित्र कलश फिरवण्यात येत असून राम मंदिर सोहळ्यात प्रत्येकाला सहभागी करुन घेतलं जात आहे. ठिकठिकाणी या कलश यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं जात असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. याच पवित्र कलश यात्रेत मुस्लीम बांधवांनी सहभागी होऊन हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवलं. प्रयाग दक्षिण भागात ही अक्षत-कलश शोभा यात्रा निघाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. त्यामुळे, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा हा राष्ट्रीय सोहळा बनला आहे. गावोगावी अक्षत पवित्र कलश पोहोचत असून रामभक्त या सोहळ्यातील शोभायात्रेत सहभागी होत आहेत. प्रयाग दक्षिणमधील एंग्लो बंगाली इंटर कॉलेज मैदानावर रविवारी दुपारी १२ वाजता कलश यात्रा सुरू करण्यात आली होती.
रामभक्त राजेश चौरसिया यांनी सर्वांना फेटे वितरीत केले होते. तर, राष्ट्रीय मुस्लीम मंचच्या मुस्लीम बांधवांनी रामभक्तांवर फुलांचा वर्षाव केला. शोभा यात्रेतील मंगल कलशवर पुष्पवृष्टी केली. मुस्लीम बांधवांकडून सामाजिक एकतेचं दर्शन घडवून सर्वधर्म समभावाचा आदर्शन निर्माण करण्यात आला. डोक्यावर फेटा बांधून रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते. येथील यात्रेत प्रभू श्रीराम, माती सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या अवतारातील व्यक्तींची आरतीही करण्यात आली.