... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:55 PM2024-01-25T14:55:37+5:302024-01-25T14:59:41+5:30

जगभरातील हिंदूंनी, जगभरातील रामभक्तांनी सोशल मीडियातून बसल्या जागी रामललाचे दर्शन घेऊन मुखातून जय श्रीराम म्हटले.

... Hence the statue of Ramlala 51 inches; The sculptor also used software by yogiraj in ayodhya ram mandir | ... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर

... म्हणून रामललाची मूर्ती ५१ इंच; मूर्तीकाराने सॉफ्टवेअरचाही केला वापर

५०० वर्षांचा वनवास संपून अखेर अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात रामलला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली अन् देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. काही मिनिटांतच अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं ते लोभस, सुंदर, मनमोहक आणि सात्विक भाव असलेलं रुप जगाने पाहिलं. सोशल मीडियावर रामललाच्या मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक दिग्गजांनी, सेलिब्रिटींनीही रामललाच्या या मूर्तीचं कौतुक केलं. वस्त्रअलंकाराने सजलेलं ते रामललाचं रुप अतिशय देखणं आहे. त्यामुळेच, या मूर्तीची चर्चाही होत आहे.  

जगभरातील हिंदूंनी, जगभरातील रामभक्तांनी सोशल मीडियातून बसल्या जागी रामललाचे दर्शन घेऊन मुखातून जय श्रीराम म्हटले. आभूषणाने सजलेली रामललाची मूर्ती डोळ्यात साठवली. पौराणिक कथांमध्ये प्रभू श्रीरामांचे केलेल्या वर्णनानुसार आणि वस्त्र अलंकारांनी रामललाच्या मूर्तीला सजविण्यात आले आहे. अध्यात्म रामायण, श्रीमद् वाल्मीकी रामायण, श्रीरामचरितमानस तथा आलवन्दार स्तोत्रांच्या अध्यायानुसार आणि त्यातील वर्णनानुसार शास्त्रसम्मत शोभूनी दिसेल, असे रामललाचे रुप साकारण्यात आले होते. रामललाची ही मूर्ती ५१ इंच असून यामागचे कारणही मूर्तीकार योगीराज यांच्या पत्नीने सांगितले. तसेच, मूर्ती बनविण्यासाठी योगीराज यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तांत्रिक बाबी तपासल्याचेही त्यांनी सांगितले

म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगिराज यांच्या पत्नीने रामललाच्या मूर्तीबद्दल माहिती दिली. योगीराज यांच्या हातात जादू आहे, म्हणूनच त्यांनी रामललाची इतकी सुंदर आणि मनमोहक मूर्ती घडवली. आम्ही केवळ मूर्ती कशी दिसावी हे सांगितलं, पण बाकी सगळं त्यांच्या प्रतिभाशक्तीचं रुप आहे. राम मंदिराकडून मूर्तीसंदर्भात काही गोष्टी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये, स्मीतहास्य, दैवी भाव, ५ वर्षीय बालकाचे रुप आणि युवराजासारखा देखणेपणा.. असे सांगण्यात आले होते. 

रामललाची मूर्ती ५ वर्षीय बालकाच्या रुपातील आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच यासाठी ठेवण्यात आली आहे की, दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी सूर्याची किरणे रामललाच्या डोक्यावर पडतील. म्हणजेच, दरवर्षी रामललाच्या डोक्यावर सुर्यकिरणांचा तेज असेल, असे योगीराज यांच्या पत्नीने सांगितले. गृहगर्भात स्थापन करण्यात आलेली ही मूर्ती कमळाच्या फुलातील आहे, या मूर्तीची लांबी ८ फूट असून वजन २०० किलो एवढे आहे.  

सोनं अन् हिऱ्याच्या अलंकाराने सजले रुप

मंदिरातील प्रभू श्रीरामांचे अलंकार बनवण्यासाठी १५ किलो सोनं, १८ हजार हिरे आणि पानांचा वापर करण्यात आला आहे. टीळा, मुकूट, ४ हार, कमरबंद, दोन जोड्या पैंजण, विजयीमाळ, अंगठीसह एकूण १४ अलंकार बनविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे केवळ १२ दिवसांत हे अलंकार बनविण्यात आले आहेत.
 

Web Title: ... Hence the statue of Ramlala 51 inches; The sculptor also used software by yogiraj in ayodhya ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.