गर्लफ्रेंडला बाईकवरून गुपचूप पार्टीला घेऊन जात होता; अपघात होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:46 IST2025-01-02T09:46:23+5:302025-01-02T09:46:33+5:30
अनेकदा शाळा, कॉलेज बंक करून ही जोडपी एखाद्या निवांत ठिकाणी फिरायला जात असतात.

गर्लफ्रेंडला बाईकवरून गुपचूप पार्टीला घेऊन जात होता; अपघात होताच हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे आले...
लपून-छपून प्रेमप्रकरणे करणे, गर्लफ्रेंडसोबत फिरायला जाणे या गोष्टी शहरातच नाही तर आता गावागावातही होत आहेत. अनेकदा शाळा, कॉलेज बंक करून ही जोडपी एखाद्या निवांत ठिकाणी फिरायला जात असतात. शहरात तसे आपला एरिया सोडला की कोणी ओळखीचे नसते, यामुळे ही जोडपी बिनदिक्कत फिरत असतात. परंतू, गावात आजुबाजुच्या गावातील लोकही ओळखत असल्याने या प्रेमीयुगुलांची पंचायत होत असते. या साऱ्यांपासून लपून नववर्षाच्या पार्टीसाठी जाणाऱ्या जोडप्याच्या बाईकला अपघात झाला आणि मुलीचे आईवडील हॉस्पिटलमध्ये येताच तरुणाची जी अवस्था झाली ती वाईट होती.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये ही घटना घडली आहे. एक तरुण एका अल्पवयीन मुलीला नववर्षाच्या पार्टीला घेऊन जात होता. बुधवारी सायंकाळी ट्रॅक्टरला त्यांची बाईक धडकल्याने अपघात झाला. यात मुलीला गंभीर दुखापत झाली होती, तर तरुणाचे थोडक्यात निभावले होते. या दोघांना जवळच्याच जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तिथे मुलीबाबत तरुणाला विचारणा करण्यात आली, तेव्हा तो ती आपली बहीण असल्याचे सांगू लागला. ती गंभीर असल्याने तिच्या कुटुंबियांना बोलविण्यास सांगण्यात आले, तेव्हा तेथील डॉक्टरांना ती प्रेयसी असल्याचे सांगावे लागले. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलवून मुलीच्या कुटुंबाला अपघाताची सूचना दिली. यामुळे मुलीचे आई-वडीलही तिथे दाखल झाले.
यानंतर तरुणाने नववर्षाचा प्लॅन सर्वांना सांगितला. मौजमस्ती करण्यासाठी हे दोघे निघालेले होते. परंतू अपघाताने यावर पाणी फेरले आणि आता त्यांचे अफेअरही जगजाहीर झाले. मुलीच्या पालकांनी तरुणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला असून ती गंभीर जखमी असल्याने तिला अलीगढला हलविण्यात आले आहे. पोलीस चौकशीत त्या मुलीनेच तरुणाला फोन करून बोलविल्याचे स्पष्ट झाले आहे.