भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:19 IST2023-10-13T16:18:08+5:302023-10-13T16:19:00+5:30
यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे.

भारतीय साधू हमासशी लढणार? नरसिंहानंद म्हणाले, "इस्रायलने आमचाही सैन्यात समावेश करावा"
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता भारतातील साधू-संतांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. साधुंचे नेतृत्व डासना देवी मंदिराचे महंत आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद करणार आहेत. ते म्हणाले की, १००० साधुंसोबत इस्रायलच्या दूतावासात जाऊन तेथील सरकारला लेखी सूचना देणार आहे आणि या युद्धात इस्रायलच्या बाजूने लढण्याची परवानगी मागणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात यती नरसिंहानंद यांनी एक व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये इस्त्रायल आणि गाझा पट्टीतील दहशतवाद्यांमध्ये युद्ध सुरू असल्याचे यती नरसिंहानंद यांनी म्हटले आहे. यामध्ये गाझा पट्टीतील दहशतवाद्यांनी इस्रायलमधील लोकांवर हल्ला केला आहे. आता या दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखली आहे, असे यती नरसिंहानंद यांनी सांगितले.
ही परिस्थिती पाहता भारतातील साधुंमध्येही या युद्धात इस्रायलला साथ द्यावी, असा आवाज उठू लागला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील १००० साधूंसोबत सोमवारी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासात पोहोचणार आहे. याठिकाणी गाझा पट्टीतील दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या युद्धात इस्रायलसोबत लढण्याची परवानगी घेणार, असल्याचे यती नरसिंहानंद यांनी सांगितले.
गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पीताधीश्वर आणि गाझियाबादमधील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये धार्मिक नेते, नेते आणि शिष्यांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे. इस्त्रायल आणि सनातनांचा एकच शत्रू आहेत.आपल्या सर्वांना त्यांच्याशी आणि त्यांच्या पुस्तकाशी लढायचे आहे. सध्या भारतातील जनता या लढ्यासाठी तयार नाही. त्यामुळे इस्रायलने आपल्या लढ्यात लढू इच्छिणाऱ्यांचा समावेश करावा, असे यती नरसिंहानंद म्हणाले.
जर इस्रायलने मला आणि माझ्या शिष्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि विश्वासाने इस्रायलमध्ये राहण्याची परवानगी दिली तर आम्ही प्रत्येक आघाडीवर लढण्यास तयार आहोत. शांतता काळात आम्ही इस्रायलच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करत राहू. युद्ध आणि आणीबाणीच्या काळात आघाडीवर राहू. आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही आमच्या धार्मिक श्रद्धा कधीच कोणावर लादत नाही. त्यामुळेच आमचा कधी कोणाशी धार्मिक वाद होण्याची शक्यता नाही, असे यती नरसिंहानंद म्हणाले.