भक्ती अन् पर्यटनाचा संगम, महाकुंभ इथं बनवली 'डोम सिटी'; एका रात्रीचं भाडे किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:07 IST2025-01-07T18:06:42+5:302025-01-07T18:07:40+5:30
डोम सिटी ही संकल्पना बर्फाळ देश इग्लू येथून पुढे आली. भारतात इतक्या भव्यतेने पहिल्यांदाच डोम सिटी उभारली आहे.

भक्ती अन् पर्यटनाचा संगम, महाकुंभ इथं बनवली 'डोम सिटी'; एका रात्रीचं भाडे किती?
प्रयागराज - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज शहरात सध्या महाकुंभ मेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी कोट्यवधी भाविक आणि पर्यटक संगम नगरीत दाखल होतील. या धार्मिक उत्सवाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुविधेसाठी डोम सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात पहिल्यांदाच डोम सिटी उभी राहत असून त्यात लग्झरी अन् अध्यात्मिक संगम पाहायला मिळणार आहे.
डोम सिटीत काय आहे खास?
डोम सिटीत ४४ बुलेटप्रूफ आणि फायरप्रूफ पारदर्शक डोम बनवले आहेत. या छोट्या डोमचं छत रिमोटने ऑपरेट होते ज्यात तुम्ही रात्रीच्या वेळी चमकत्या ताऱ्यांचा नजारा पाहू शकता. प्रत्येक डोमला अत्यंत सुबक पद्धतीने सजवण्यात आलं आहे ज्यात आधुनिकता आणि अध्यात्मिकतेचा अनोखा संगम पाहता येईल.
डोम सिटी राहण्यासाठी किती खर्च?
डोम सिटीत राहण्याचा अनुभव एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही जास्त आहे. याठिकाणी VIP सूट बनवण्यात आले आहे. तिथे स्नान पर्वच्या दिवशी १,११,००० हजार रुपये प्रति रात्र भाडे आहे. अन्य दिवशी याठिकाणी ८१ हजार रुपये भाडे आकारण्यात येईल. त्याशिवाय इथं वुडनचे कॉटेज बनवण्यात आले आहेत तिथे ४१ हजार ते ६१ हजारापर्यंत भाडे आकारण्यात येणार आहे.
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
प्रत्येक डोममध्ये टॉयलेट, बाथरुमची सोय आहे. त्याशिवाय ओपन एअर स्पेस, जिथून गंगा नदी आणि महाकुंभमधील कार्यक्रमाचं दर्शन होईल. यज्ञशिला मंदिर, योग करण्याची जागा, दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य आरती होणार आहे.
पहिल्यांदाच भारतात इग्लूसारखा अनुभव
डोम सिटी ही संकल्पना बर्फाळ देश इग्लू येथून पुढे आली. भारतात इतक्या भव्यतेने पहिल्यांदाच डोम सिटी उभारली आहे. प्रत्येक डोमची उंची १५ फूट इतकी आहे ज्यातून चहुबाजूने चांगला नजारा दिसून येईल. गोलाकार आकारात फायबर सीट तयार करण्यात आली आहे. अत्यंत थंडीतून वाचण्यासाठी याचा वापर केला जातो. भारतात काही निवडक हिल स्टेशनवर डोम बनवण्यात आले आहेत. प्रयागराज इथं महाकुंभमध्ये चव्वेचाळीस डोम आणि त्याशिवाय १७५ वुडन कॉटेज उभारले आहेत.