“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:14 IST2025-11-03T16:10:32+5:302025-11-03T16:14:01+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी "जनता दरबार" आयोजित केला.

“राज्यातील जनतेची सुरक्षितता अन् सन्मानासाठी सरकार वचनबद्ध आहे”: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
लखनऊ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी "जनता दरबार" आयोजित केला. मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यातील पीडितांची भेट घेतली, त्यांच्या समस्या ऐकल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत योग्य तोडगा काढण्याचे आणि पीडितांकडून अभिप्राय घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीत, एकामागून एक ६० हून अधिक पीडितांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या समस्यांबद्दल माहिती दिली.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. जनता दरबारात अनेक पीडितांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतरही वसुली न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जमीन अतिक्रमणाबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आदेश दिले.
उपचारासाठी आर्थिक मदत मागितली
एका पीडितेने उपचारासाठी आर्थिक मदत मागितली. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, रुग्णालयातून स्टेटमेंट घेऊन त्यांना पाठवा. तुमच्या रुग्णाची काळजी घ्या. बाकीचे आमच्यावर सोपवा. निधीअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबणार नाही. सरकार पहिल्या दिवसापासून प्रत्येक गरजू व्यक्तीला उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी मुलांना चॉकलेट दिले
जनता दरबार दरम्यान तक्रारदारांसोबत आलेल्या मुलांची मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली. त्यांना आपलेपणाची भावना दिली. मुख्यमंत्री योगी यांनी सर्व मुलांना चॉकलेट दिले. मन लावून मेहनतीने अभ्यास करण्याचे, भरपूर खेळण्याचे आणि त्यांच्या पालकांचे ऐकण्याचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी मुलांना केले.