मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 09:27 IST2025-09-22T09:23:59+5:302025-09-22T09:27:43+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी लखनौ येथील लोकभवन सभागृहात महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबनासाठी समर्पित 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी अभियानाचा भव्य शुभारंभ केला.

Chief Minister Yogi Adityanath launches 'Mission Shakti 5.0'; Focus on women's safety, increased participation of women in police! | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

पूर्वी मुली सुरक्षित नव्हत्या, पण आज त्या स्वतःच आपला मार्ग तयार करत आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि आत्मनिर्भरता यासाठी समर्पित 'मिशन शक्ती ५.०' या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. २०१७नंतर राज्यात महिलांच्या स्थितीत मोठे बदल झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

काय आहे 'मिशन शक्ती ५.०'?

'मिशन शक्ती'च्या पाचव्या टप्प्याचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी हे अभियान सुरू झाले तेव्हा अनेक शंका होत्या, पण आज त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या अभियानाने महिलांना सुरक्षा, सन्मान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे.

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व १६४७ पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या ‘मिशन शक्ती केंद्रां’चे उद्घाटन केले. महिला सुरक्षेशी संबंधित सर्व हेल्पलाईन (१०९०, १८१, ११२, १९३०, १०७६, १०२, १०१, १०८, १०९८) तसेच 'सशक्त नारी, समृद्ध प्रदेश'चेही प्रकाशन करण्यात आले.

महिला पोलिसांची संख्या १० हजारांवरून ४४ हजार पार!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांमधील महिलांच्या सहभागातील क्रांतीकारी बदलावर भर दिला. २०१७पर्यंत पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या केवळ १०,००० होती, जी आज ४४,०००पेक्षा जास्त झाली आहे. प्रत्येक भरतीमध्ये २०% महिलांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे.

अलीकडेच झालेल्या ६०,२०० पोलीस भरतीमध्ये १२ हजारांहून अधिक महिलांचा समावेश आहे. २०१७ पूर्वी पोलिसांना प्रशिक्षण देण्याची क्षमता केवळ ३००० होती, जी आता वाढवून ६०,०००हून अधिक करण्यात आली आहे.

सरकारची नियत स्वच्छ असेल, तर योजना स्वतःच मार्ग काढतात!
सीएम योगी यांनी सांगितले की, केवळ पोलीसच नाही, तर शिक्षण आणि इतर विभागांमध्येही महिलांचा सहभाग वाढला आहे. ‘रोजगार मिशन’ सातत्याने सुरू आहे. २०१७पूर्वी महिलांच्या योजनांमध्ये घोटाळे होत होते. पोषण आहार मिशन आणि नोकऱ्यांमधील गैरव्यवहार ही त्याची उदाहरणे आहेत.आता पोषाहार मिशनमध्ये ६०,००० महिला काम करत आहेत आणि महिन्याला ८००० रुपये कमावत आहेत. 

कोरोना काळात सुरू झालेल्या बँकिंग कॉरेस्पॉन्डेंस सखी योजनेतून ४०,००० हून अधिक महिला हजारो कोटी रुपयांचे व्यवहार करत आहेत. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत २६ लाखांहून अधिक मुलींना जन्मापासून पदवीपर्यंत २५,००० रुपयांची मदत मिळत आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत आता गरजू मुलींना १ लाख रुपयांची मदत मिळत आहे.

गुन्हेगार आता माफी मागतात!
महिला सुरक्षेवर बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेली येथील घटनेचा उल्लेख केला. “बाहेरील गुन्हेगाराने महिला सुरक्षेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कारवाईनंतर तो म्हणाला, 'मी चुकून उत्तर प्रदेशात आलो, यापुढे अशी चूक करणार नाही'.” १ जानेवारी २०२४ पासून ९५१३ प्रकरणांमध्ये १२,२७१ गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली असून, त्यात १२ जणांना फाशीची शिक्षा, तर ९८७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, महिला कल्याण मंत्री बेबीराणी मौर्य यांच्यासह अनेक अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Yogi Adityanath launches 'Mission Shakti 5.0'; Focus on women's safety, increased participation of women in police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.