आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:45 IST2024-08-09T13:45:07+5:302024-08-09T13:45:58+5:30
Uttar Pradesh Paper Leak: एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे.

आणखी एक पेपर फुटला, आता या परीक्षेत झाला गोंधळ, ४ लाखांत व्यवहार, CBIकडून भांडाफोड
एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून पेपर लीकविरोधात कठोर भूमिका घेत असताना दुसकीकडे काही विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळे सरकारच्या भूमिकेला धक्का बसताना दिसत आहे. आता रेल्वे डिपार्टमेंटल प्रमोशनचे पेपर फुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. सीबीआयने ही कारवाई रेल्वे बोर्डाच्या व्हिजिलेन्स विभागाने केलेल्या तक्रारीनंतर केली आहे. ६ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनरल डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचे पेपर लीक झाल्याचे उघड झाले होते.
लखनौमध्ये सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परीक्षा देणाऱ्या आणि पेपर लीक करणाऱ्या ११ रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या व्हिजिलेन्स तपास रिपोर्टच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील ११ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. ज्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या त्यामध्ये प्रयागराज, नोएडा, अलिगड, मथुरा, चित्रकुट, जयपूर, भरतपूर, करौली, अलवर, सवाई माधोपूर या शहरांचा समावेश आहे. या धाडींदरम्यान, सीबीआयला काही महत्त्वपूर्ण कागदपत्रंही सापडली आहेत. परीक्षेच्या एक दिवस आधी गाझियाबाज मधील रेल्वेस्टेशनजवळ एका खोलीमध्ये प्रश्नांची उत्तरं सांगितली गेली होती. तसेच परीक्षार्थिंकडून प्रत्येकी ४ लाख रुपये वसूल करण्यात आले होते.
दरम्यान, सीबीआयने परीक्षा घेणाऱ्या अपटेक लिमिटेड या एजन्सीलाही आरोपी बनवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराज रेल्वे भरती बोर्डाकडून ६ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित डीजीसीई परीक्षेचा पेपर लीक करून ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्यातील उत्तरं पुरवण्यात आली होती. दरम्यान, एफआयआरमध्ये भूप सिंह, वेगराज, महावीर सिंह आणि प्रीतम सिंह, जिंतेंद्र कुमार मीणा, प्रमोद कुमार मीणा, हंसराज मीणा, धर्म देव, प्रशांत कुमार मीणा, मान सिंह आणि मोहित भाटी आदी रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत.