अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:56 IST2025-09-18T16:55:45+5:302025-09-18T16:56:33+5:30

अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यासोबतच त्यांचं मानधन वाढवण्याचीही मोठी घोषणा केली.

Anganwadi workers will get smartphones, honorarium will increase, Yogi Adityanath's big announcement | अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशच्या धार येथून ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ केला. या ऐतिहासिक क्षणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी सायंटिफिक कन्व्हेन्शन सेंटर, केजीएमयू येथे राज्यस्तरीय कार्यक्रमांची सुरुवात केली. त्यांनी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यासोबतच त्यांचं मानधन वाढवण्याचीही मोठी घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत, उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये महिला आणि मुलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आरोग्य शिबिर सुरू करण्यात आली आहेत.

या मोहिमेची सुरुवात करताना पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, माता, भगिनी आणि मुलींचे आरोग्य ही सरकारची प्राथमिकता आहे. आरोग्य शिबिरांमध्ये सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्यामुळे तपासण्या करून घ्याव्यात असं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी विकसित भारतासाठी नारी, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार स्तंभांवर भर दिला. यापैकी नारी शक्तीला त्यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य आधार मानलं. विश्वकर्मा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेली ही मोहीम 'स्वस्थ नारी' आणि 'सशक्त परिवार'ची पायाभरणी करेल, असंही ते म्हणाले.

अंगणवाडी सेविकांसाठी मानधनवाढीची भेट

या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांचं अन्नप्राशन केलं आणि गर्भवती महिलांना पोषण आहार देऊन त्यांच्या डोहाळजेवण समारंभाचं आयोजन केलं. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यासोबत जोडला गेला आहे आणि उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेच्या वतीने त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. योगी आदित्यनाथ यांनी अंगणवाडी सेविकांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी स्मार्टफोन देण्यासोबतच त्यांचे मानधन वाढवण्याची मोठी घोषणा केली. यामुळे त्यांना प्रशिक्षण आणि वेळेवर वेतन मिळून त्या आत्मनिर्भर बनतील.

उत्तर प्रदेशात २०३२४ आरोग्य शिबिरं

मुख्यमंत्री योगींनी उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमध्ये २०३२४ आरोग्य शिबिरांची सुरुवात केली आहे. या शिबिरांमध्ये रक्त, रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, ॲनिमिया आणि टीबीची तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. ही मोहीम गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी, मुलांचं लसीकरण आणि जागरूकता यावर लक्ष केंद्रित करेल. या व्यतिरिक्त ५०७ रक्तदान शिबिरे देखील आयोजित केली जातील. योगींनी आरोग्य विभागाच्या तयारीचं कौतुक केलं.

महिला सक्षमीकरणासाठी सरकारचं मजबूत पाऊल

योगींनी महिला सक्षमीकरणासाठी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ', 'मातृ वंदना', 'कन्या सुमंगला' आणि 'नारी शक्ती वंदन अधिनियम' यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. गेल्या आठ वर्षांत उत्तर प्रदेश सरकारने मुलींच्या विनामूल्य शिक्षणासाठी आणि कन्या सुमंगला योजनेअंतर्गत २५००० रुपयांचे पॅकेज दिले आहे. सामूहिक विवाह योजनेत प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी १ लाख रुपयांची मदत दिली जात आहे. १.८९ लाख अंगणवाडी केंद्रे आणि १० लाख महिला बचत गटांच्या माध्यमातून १ कोटी महिलांना आत्मनिर्भर बनवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 

Web Title: Anganwadi workers will get smartphones, honorarium will increase, Yogi Adityanath's big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.