आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 07:01 IST2024-06-16T06:59:40+5:302024-06-16T07:01:10+5:30
घटनास्थळी मच्छिमार नसते तर तरूणाला जीव गमवावा लागला असता म्हणूनच रागात त्यांनी त्याला मारहाण केली.

आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. इथे आईचा ओरडा सहन न झाल्याने संतापलेल्या तरूणीने पुलावरून नदीत उडी मारली. तरूणीने उडी मारल्याचे समजताच तिच्यासोबत असलेल्या तरूणाने देखील त्याच मार्गाने जात नदीत उडी घेतली. खरे तर हे प्रेमी युगुल असल्याचे सांगितले जात आहे. घरी आईशी वाद झाल्यामुळे संबंधित तरूणी संतापली होती आणि याच रागात तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
'क्राईम तक'ने दिलेल्या माहितीनुसार, सुलतानपूरमधील ही घटना एका शुल्लक कारणावरून घडली. तरूणीचा तिच्या आईसोबत वाद झाला होता. मग आईने तिला ओरडताच ती संतापली अन् तेथील पुलावरून गमती नदीत उडी मारली. मुलीला उडी मारताना पाहून तिच्या प्रियकराने देखील नदीत उडी मारली. हे पाहताच काठावर उपस्थित मच्छिमारांनी दोघांचा जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. मच्छिमारांनी दोघांचे प्राण वाचवले. दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती.
मच्छिमार बनले देवदूत
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसते की, मच्छिमार या प्रेमी युगुलाला बाहेर काढत आहेत. याशिवाय त्यातील काही जणांनी संबंधित तरूणाला चोप दिला. नंतर या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडल्याचे कळते. सुलतानपूरमध्ये एका तरुण आणि तरुणीचा नदीत उडी मारल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघांचा जीव वाचवल्यानंतर एक मच्छीमार उडी मारणाऱ्या तरुणाला कानाखाली मारताना दिसत आहे. घटनास्थळी मच्छिमार नसते तर तरूणाला जीव गमवावा लागला असता म्हणूनच रागात त्यांनी त्याला मारहाण केली.