सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:57 IST2023-06-27T14:56:11+5:302023-06-27T14:57:10+5:30
Ayodhya Ram Mandir Security : मंदिराची सुरक्षा बळकट करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती.

सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये
बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील. रामलल्ला मंदिराच्या सुरक्षा आराखड्यावर सुमारे 38 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. निधी मंजूर झाला असून बांधकामाची जबाबदारी यूपी निर्माण निगमकडे सोपवण्यात आली आहे. त्याचा डीपीआर येत्या काही दिवसांत सरकारला पाठवला जाणार आहे. यामध्ये जल, जमीन आणि आकाश या तिन्ही बाजूंनी सुरक्षा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे.
मंदिराची सुरक्षा बळकट करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्याची तयारी सुरू आहे. उद्घाटनापूर्वी राम मंदिराची सुरक्षा कडक पहायला मिळणार आहे. 15 जानेवारी 2024 नंतर उद्घाटन शक्य आहे आणि त्यानंतर रामलल्लाच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येईल.
उद्घाटनापूर्वी श्री राम मंदिर आणि येणाऱ्या भाविकांची सुरक्षा बळकट करण्याच्या धोरणावर प्रशासन काम करत आहे. मंदिराला हवाई हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासोबतच सरयू नदी आणि जमिनीवरून सुरक्षा योजना आखण्यात आली आहे. दरम्यान, मंदिराबाहेर सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. ट्रस्ट रामलल्लाच्या मंदिरातील व्यवस्था पाहणार आहे. तसेच, अंतर्गत सुरक्षेबाबत प्रशासनाचे अधिकारीही समन्वय साधतील.
मंदिराबाहेर निमलष्करी दलासह (CRPF) इतर दल तैनात असतील. हवाई सुरक्षेसाठी अत्याधुनिक प्लांट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. फायर सेफ्टी, बोलार्ड, बुलेट प्रुफ जॅकेट, सर्च लाईट बसवण्यात येणार आहे. राम मंदिराजवळून वाहणाऱ्या सरयू नदीच्या बाजूनेही सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी पाण्याच्या सुरक्षेसह विशेष बोटींवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मंदिराच्या आतील सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात अत्याधुनिक कॅमेऱ्यांनी सुसज्ज सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
मंदिराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक उपकरणांसह नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, रामलल्लाच्या मंदिराचा सुरक्षा आराखडा तयार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 38 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी नोव्हेंबरची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे, असे मंडलायुक्त गौरव दयाल यांनी सांगितले.