'CM who demanded Rs 25,000 per hectare last year should announce aid now', raju shetty on uddhav thackarey | 'मागील वर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी'

'मागील वर्षी हेक्टरी 25 हजारांची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मदत जाहीर करावी'

उस्मानाबाद - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींनीउस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी दौरा केला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, आता पाहणी बास करा, मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणीही राजू शेट्टींनी केली आहे. 

शेतकऱ्यांचं न भरुन येणार नुकसान झालंय. शेतातील पिकांसह माती आणि जनावरंही पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. शेतातील विहिरी मातीनं भरुन गेल्या आहेत. विहिरींवरी मोटारीही पाण्यात अन् मातीत बुजल्या आहेत. त्यामुळे, शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या बांधापर्यंतही नीटपणे जाता येत नाही. त्यामुळे, पंचनामे करण्याची ही वेळ नसून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करायला हवा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. मुख्यमंत्री आज उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत, त्यांनी मदतीची घोषणा करावी. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याआधी मागील वर्षी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. आता तर ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना  मदत द्यावी. केंद्र सरकारनेही हात झटकू नयेत. सरकारने वेळीच मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढाई लढेल.’असेही शेट्टी म्हणाले.

नुकसानीच्या पाहणीचे नुसते दौरे नको, राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत जाहीर करावी. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, अशा इशाराही  राजू शेट्टी यांनी मंगळवेढा येथे पत्रकार परिषदेत दिला होता. ‘अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोलमडलेल्या शेतक-यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर आपत्ती निवारण फ़ंड तयार करावा. सध्या या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ५० हजार कोटीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून १५ हजार कोटी रुपये व केंद्र सरकारने केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ३५ हजार कोटी रुपयाची भरपाई द्यावी. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांचे नुकसान लक्षात घेऊन मदत करणे गरजेचे आहे.’ असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा आज उस्मानाबाद दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी (दि. २१) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

Web Title: 'CM who demanded Rs 25,000 per hectare last year should announce aid now', raju shetty on uddhav thackarey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.