Bursting fireworks factory, fortunately 'they' survived because of the holiday | फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, सुट्टी झाल्यामुळे सुदैवाने 'ते' बचावले

फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, सुट्टी झाल्यामुळे सुदैवाने 'ते' बचावले

वाशी / तेरखेडा (उस्मानाबाद) : फटक्याची मराठवाड्यातील शिवकाशी समजल्या जाणाऱ्या तेरखेडा येथील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. दरम्यान, घटनेवेळी कारखान्यात कोणीही नसल्याने मोठी जिवितहानी टळली. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षातील हा येथे नवव्यांदा स्फोटाची घटना घडली आहे. 

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील वेलकम फायर वर्क्स या कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. हा कारखाना एएम पठाण यांच्या मालकीचा असून, तो त्यांनी भाडेतत्वावर दिला आहे. दिवाळी जवळ येत असल्याने फटाका निर्मितीच्या कामाला गती आली आहे. वेलकम कारखान्यातही रविवारी दिवसभर फटका निर्मितीचे काम सुरु होते. याठिकाणी सुमारे 10 ते 12 मजूर कामावर आहेत. दरम्यान, त्यांची सायंकाळी सुटी झाल्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या एका बंद खोलीत जोरदार स्फोट झाला. या स्फोटाने खोलीवरील पत्रे दूरवर उडून पडले. यावेळी या परिसरात कोणीही नसल्याने जिवितहानी टळली आहे. या घटनेत नेमके किती नुकसान झाले? व स्फोट कश्यामुळे घडून आला? हे पंचनामा व चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेले तहसीलदार डॉ़संदीप राजपुरे यांनी दिली.

सुटी झाल्याने ते बचावले...
तेरखेडा येथील स्फोट झालेल्या कारखान्यात दररोज 10 ते 12 मजूर कामावर असतात. या कामगारांची सायंकाळी 5 वाजता सुटी झाली होती़ यामुळे सायंकाळी स्फोट झालेल्या वेळी याठिकाणी कोणीही नव्हते. काम उशिरापर्यंत चालले असते तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी होती.


चार वर्षांत स्फोटामध्ये 9 ठार...
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट होण्याची गेल्या चार वर्षांतील ही तिसरी दुर्घटना आहे. यापूर्वी 8 जुलै 2014 रोजी वीज कोसळून एकाच दिवशी दोन कारखान्यात स्फोट झाले़ त्यात 8 जागीच ठार तर 6 जखमी झाले होते. विशेष म्हणजे आज स्फोट झालेला वेलकम कारखाना त्याहीवेळी भक्ष्यस्थानी सापडला होता. दरम्यान, चालू वर्षातच काही महिन्यांपूर्वी तेरखेडा व इंदापूर शिवारात असलेल्या एका कारखान्यात स्फोट होवून 1 कामगार ठार झाला आहे.

Web Title: Bursting fireworks factory, fortunately 'they' survived because of the holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.