बोअर होतंय ? -मग फोन करा, call now !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 17:33 IST2020-03-28T17:30:30+5:302020-03-28T17:33:21+5:30
आपल्याला एरव्ही ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं, पण आपल्याला त्यांना फोन करायला वेळ होत नाही अशा लोकांना फोन करायचे.

बोअर होतंय ? -मग फोन करा, call now !
- गौरी पटवर्धन
घरात बसून राहायला बोअर होतं यार. शिवाय ‘हे करू नको’, ‘ते करू नको’, ‘फार वेळ गेम्स खेळू नको’, ‘सारखा टीव्ही बघू नको’, हे सगळे नियम असतातच मागे. अशात जर आई-बाबांकडे आपण फोन मागितला तर काय होईल? आधी ते नाही म्हणतील. आपण परत मागितला तर? रागावतील!
पण जर आपण त्यांना सांगितलं की आपल्याला तो मोबाइल का पाहिजे आहे तर कदाचित ते फोन देतील आपल्याला. तो फोन मिळाल्यावर आपण काय करायचं माहिती आहे का? तर आपल्याला एरव्ही ज्यांच्याशी बोलावंसं वाटतं, पण आपल्याला त्यांना फोन करायला वेळ होत नाही अशा लोकांना फोन करायचे.
असे लोक कोण असू शकतात? तर आपले नातेवाईक असू शकतात. आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या, दादा, वहिनी, ताई, तेही त्यांच्या त्यांच्या घरात अडकून पडलेले असतात. त्यांच्याशी निवांत फोनवर गप्पा मारण्यासाठी ही चांगली संधी असू शकते.
किंवा असे अनेक लोक असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असते. ते लोक कुठे राहातात? कसे जगतात? त्यांच्या घरी कोण कोण असतं? हे आपल्याला अजिबात माहिती नसतं; पण ते लोक तर अगदी जवळून आपल्या ओळखीचे असतात. म्हणजे कोण? तर आपल्या घरी कामाला येणा:या मावशी, सोसायटीतील कचरा घेऊन जाणारे काका, नेहमीचे भाजीवाले काका, घरी दूध आणून देणारा दादा असे अनेक लोक आपली खूप कामं करत असतात. त्यांनाही आत्ता घरी बसून राहावं लागत असेल. तुम्ही त्यांना फोन करून त्यांची चौकशी केलीत तर त्यांनाही बरं वाटेल. कारण शेवटी आनंदात सेलिब्रेट करताना सगळेच एकमेकांबरोबर असतात; पण अडचणीच्या वेळी जे एकमेकांची काळजी घेतात तेच आपले खरे जवळचे लोक असतात..हो ना?