‘सहल’ सीनिअर सीटीझन्सची !
By Admin | Updated: April 12, 2017 17:37 IST2017-04-12T17:24:41+5:302017-04-12T17:37:55+5:30
वृद्ध व्यक्तींचा प्रवास हा आपल्या मुलांकडे जाण्यासाठी, नातेवाईकांकडे काही निमित्तानं जाण्यासाठीच होतो हा समज आता मागे पडत चालला आहे.

‘सहल’ सीनिअर सीटीझन्सची !
- अमृता कदम
वृद्ध व्यक्तींचा प्रवास हा आपल्या मुलांकडे जाण्यासाठी, नातेवाईकांकडे काही निमित्तानं जाण्यासाठीच होतो हा समज आता मागे पडत चालला आहे. आता साठीच्या पुढचे आजी-आजोबाही ग्रुपनं किंवा अगदी एकट्यानंही फिरायला बाहेर पडतात. इतकी वर्षं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर स्वत:साठी वेळ देण्याचा, आनंदाचे क्षण उपभोगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आजी-आजोबांची ट्रीप फॅमिलीबरोबर असेल तर त्यांची काळजी घ्यायला कुटुंबातले लोक असतात. पण जर सीनिअर सिटीझन्स ट्रॅव्हल कंपनीसोबत, ग्रुपनं जाणार असतील थोडीशी काळजी घेणंही गरजेचं आहे...त्यांच्या ट्रीपचा आनंद वाढवण्यासाठी या खबरदारीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.
1. हवामान, प्रवासातली सुकरता, तुमची सुरक्षितता यांचा नीट विचार करु न तुम्हाला फिरायला जायचं ठिकाण निश्चित करा. म्हणजे तुम्हाला जर श्वासनविकार असतील तर अति उंचावरची ठिकाणं (लडाख, कैलास-मानसरोवर यांसारखी) टाळावीत. तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत जाणार असाल, तर ट्रॅव्हल एजंटला आधीच आपल्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली तर ते तुम्हाला अनुरु प अशी ट्रॅव्हल डेस्टिशन्स सुचवू शकतात.
2. वयाच्या 55-60 वर्षानंतर अनेकांच्या खाण्यापिण्यावर बंधन येतात. काही पथ्यंपाणी पाळावी लागतात. तसेच बाहेरच्या ठिकाणी किंवा परदेशामध्ये मिळणारे पदार्थ आवडतीलच असंही नसतं. कारण त्या पदार्थांची, त्यातल्या घटकांची आपल्याला सवय नसते. अशावेळी आपल्याला मानवतील असे पदार्थ कुठे मिळतील याची थोडी आधीच माहिती घेऊन ठेवावी. मोठ्या ग्रुपनं सोबत जाणार असाल, तर पॅन्ट्रीचाही आॅप्शन ट्राय करु शकता. शिवाय आपल्या सोबत थोडा कोरडा खाऊ ठेवलेलाही चांगलाच! जिथे जात आहात, तिथे थोडी फळं वगैरे घेऊनही प्रवासातले खाण्याचे हाल टाळता येतात.
3. तुम्हाला शुगर, बीपी, गुडघेदुखी किंवा इतर आजार असतील तर तुमच्या नेहमीच्या गोळ्या-औषधं तुमच्या बरोबर ठेवा. कारण हव्या असलेल्या गोळ्या अचानकपणे त्रास झाल्यास मिळतीलच असं नाही. त्याचप्रमाणे प्रवासात उद्भवणाऱ्या किरकोळ समस्यांसाठीही तुमच्यासोबत थोडीफार औषधं असू द्यात.
4. तुमची औषधं ही सामानाच्या बॅगेत न ठेवता जवळच्या पर्समध्ये किंवा हँडबॅगमध्ये ठेवा. म्हणजे ती नेहमी तुमच्या हाताशी राहतील आणि तुम्हाला तुमच्या औषधाच्या वेळाही सांभाळता येतील. त्याचबरोबर तुमच्या सामानात तुमच्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन,त्यांचा नंबर, तुम्हाला एखाद्या वस्तूची, पदार्थाची अॅलर्जी असेल तर त्याचे डिटेल्स अशा काही गोष्टीही असू द्या. तसेच ब्लड शुगर मॉनिटरसारखं आवश्यक उपकरणही सोबत ठेवा.
5. प्रवासात सोबत आवश्यक सामानच ठेवा, हा सल्ला खरं तर सगळ्यांनाचा दिला जातो. पण ‘ट्रॅव्हल लाइट’ हा मंत्र सीनिअर सिटीझन्ससाठी जास्त महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा ‘लागलं तर असू द्यावं, आपल्याला थोडीच उचलून न्यायचंय’ म्हणत आजी-आजोबा अनेक अनावश्यक गोष्टीही सोबत घेतात. तसं करु नका. आपल्याला ज्या गोष्टी अत्यंत गरजेच्या वाटतात, त्याची लिस्ट बनवून तेवढयाच सोबत न्या.
6. चष्मा विसरून शोधाशोध करणं ही बऱ्याच आजी-आजोबांची सवय असते. त्यामुळेच तुमच्या सामानात एक जास्तीचा चष्मा ठेवा. म्हणजे चष्मा हरवला, गहाळ झाला, तर त्याच्या नादात प्रवासात अस्वस्थ वाटणार नाही आणि त्याचा परिणाम सहलीवर होणार नाही.
7. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल, तर तुमच्या सामानात एखादी फोल्डिंगची काठी ठेवायला हरकत नाही. लांबचा किंवा थोडा चढणीचा रस्ता असेल, तर तुम्हाला त्याची मदतच होईल.
8. विमान प्रवास करताना बेल्टवर सारख्या दिसणाऱ्या बॅगमधून आपली बॅग ओळखताना गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे आपल्या बॅगवर काहीतरी खूण करून ठेवा.
9. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर पासपोर्ट, काही ठिकाणी आवश्यक असणाऱ्या व्हिसा सारख्या कागदपत्रांची खबरदारी नक्की घ्या. पण त्याचबरोबर जर तुम्हाला खूप चालण्यामध्ये त्रास होत असेल तर व्हिलचेअरसारख्या सुविधांचा लाभ घ्या. कारण बऱ्याचदा अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सिक्युरिटी चेक ते बोर्डिंग गेटपर्यंतचं अंतर जास्त असतं. म्हणजे इमिग्रेशन, चेकिंग पॉइंटवरची धावपळ तुम्हाला दमवणार नाही.
10. दुसऱ्या देशात किंवा प्रांतात भाषेची अडचण येऊ शकते. त्यामुळेच स्थानिक गाइड सोबत घेणं केव्हाही चांगलं.
11. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे परदेशामध्ये तिथल्या चलनाबद्दल जाणून घ्या. किती पैसे सोबत ठेवायचे त्याची नीट माहिती घ्या. सगळेच पैसे खिशात न ठेवता काही पैसे हे बॅगेत अडीनडीला म्हणून ठेवा.
मौजेला वयाचं बंधन का असावं? छोट्या-छोट्या गोष्टींचं नीट नियोजन केलं, तर अगदी साठीनंतरही कोणावरही अवलंबून न राहता सहलीचा, प्रवासाचा मस्त आनंद नक्कीच लुटता येऊ शकतो!