एकाच ठिकाणी थांबून सुट्टी एन्जॉय करायचीय? लॅंसडाउन ठरेल परफेक्ट आणि पैसा वसूल डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:18 IST2019-05-16T12:14:15+5:302019-05-16T12:18:41+5:30
एकाच ठिकाणी थांबून निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळावी अशी फार मोजकीच ठिकाणं आहेत.

एकाच ठिकाणी थांबून सुट्टी एन्जॉय करायचीय? लॅंसडाउन ठरेल परफेक्ट आणि पैसा वसूल डेस्टिनेशन!
(Image Credit : Travelrasoi)
एकाच ठिकाणी थांबून निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळावी अशी फार मोजकीच ठिकाणं आहेत. काही लोकांना फार जास्त फिरत बसण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना एकाच ठिकाणी जाऊन सुट्टी एन्जॉय करायची असते. अशा लोकांसाठी एक खास ठिकाण आहे. ते म्हणजे उत्तराखंडमधील लॅंसडाउन. लॅंसडाउन हे उत्तराखंडच्या गढगाव जिल्ह्यातील छावणी गाव आहे. इथे सुंदर तलाव, डोंगररांगा, बोटिंग, १०० पेक्षा अधिक ऐतिहासिक इमारती आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येऊ शकतो. चला जाणून घेऊ या ठिकाणाची खासियत..
काय आहे खास?
नैसर्गिक सुंदरतेने वेढलेल्या लॅंसडाउनला १८८७ मध्ये इंग्रजांनी वसवलं होतं. त्यावेळी व्हॉइसरॉय ऑफ इंडिया लॉर्ड लॅंसडाउन यांच्या नावावरूनच या ठिकाणाला नाव देण्यात आलं होतं. या ठिकाणाचं खरं नाव कालूडांडा असं आहे. हा परिसर सेनेच्या अख्त्यारित येतो आणि गढवाल रायफल सेनेचा गढ आहे. इथे गढवाल रायफल्स आणि रेजिमेंटचं म्युझिअम आहे. सेनेशी संबंधित अनेक गोष्टी इथे बघायला मिळतात.
जवानांना समर्पित तलाव
गढवाली भुल्लाचा अर्थ लहान भाऊ असा होतो. सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना हा तलाव समर्पित आहे. इथे तुम्ही बोटिंग आणि पॅडिंगचा आनंद घेऊ शकता. चिल्ड्रेन पार्क आणि बांबूची घरेही बघता येतात.
सनसेट बघण्यासाठी होते गर्दी
टिन अॅन्ड टॉप हा पॉइंट जरा उंचीवर आहे. जर तुम्हाला दूरदूरपर्यंत पसरलेले गाव आणि डोंगर बघायचे असतील तर टिन अॅन्ड टॉपपेक्षा दुसरी सुंदर जागा नाही. खासकरून फोटोग्राफीचे शौकीन लोक इथे फोटोग्राफीसाठी येतात.
ट्रेकिंग करत महादेवाच्या दारी
जंगलांमधून ट्रेकिंग करण्याची आवड असेल तर लॅंसडाउन भैरवगढी आणि ताडकेश्वर मंदिराचा रस्ता निवडू शकता. मंदिराचा रस्ता मोठ मोठ्या झाडांमधून जातो. हे मंदिर लॅंसडाउनपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे भगवान शिवाचं मंदिर आहे.
लव्हर्स लेन
लव्हर्स लेन लॅंसडाउनमधील सर्वात लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. हे ठिकाण खासकरून ट्रेकिंग आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय आहे. येथील रस्त्यात एकीकडे हिमालयातील उंचच डोंगर दिसतात तर दुसरीकडे उंचच उचं झाडे. हे ठिकाण शांत आणि सुंदर असल्याने इथे कपल्स अधिक येतात.
कधी जाल?
इथे फिरायला जाण्यासाठी सर्वात चांगला कालावधी हा मार्च ते जून मानला जातो. या काळात इथे ना जास्त थंडी राहत ना गरमी. इथे तुम्ही दोन दिवस आरामात एन्जॉय करू शकता.
कसे पोहोचाल?
दिल्लीहून लॅंसडाउन २५० किमी अंतरावर आहे. येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन देहरादून आहे. देहरादूनहून लॅंसडाउन हे अंतर ८१ किमीचं आहे.