Travel tips: भारतात या ठिकाणी पडतात पहिली सुर्यकरणे, प्रकाशाचा हा उत्सव केवळ नयनरम्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:55 IST2022-02-25T18:54:03+5:302022-02-25T18:55:01+5:30
डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १९९९ पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात.

Travel tips: भारतात या ठिकाणी पडतात पहिली सुर्यकरणे, प्रकाशाचा हा उत्सव केवळ नयनरम्य
भारतात सर्वात प्रथम सूर्योदय होणारे राज्य अरुणाचल प्रदेश आहे हे आपण जाणतो. पण या राज्यात सुद्धा सूर्याची पहिली किरणे पडणारे जे गाव आहे ते अतिशय छोटे आणि फार सुंदर आहे. त्याचे नाव आहे डोंग. भारत- चीन- म्यानमार ट्राय जंक्शनवर असलेले हे पिटुकले गाव पृवोत्तर सीमेवरचे भारत हद्दीतले पहिले गाव आहे. यापूर्वी अंदमानच्या कटचल टापूवर सूर्याची पहिली किरणे पडतात असे मानले जात होते. मात्र आता डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १९९९ पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात.
भारतातील बहुतेक भाग जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा म्हणजे पहाटे ३ वाजता डोंग वर सूर्यकिरणे पडतात. पहाटे चार वाजता येथे स्वच्छ उजाडलेले असते आणि येथील लोक त्यांच्या रोजच्या कामाला लागलेले असतात. येथे १२ तासांचा दिवस असतो. आपण जेव्हा दुपारी चारच्या सुमारास चहा पाणी घेण्याच्या तयारीत असतो तेव्हा हे चिमुकले गाव रात्रीच्या गडद अंधारात झोपण्याच्या तयारीत असते. समुद्रसपाटी पासून १२४० मीटर उंचीवर असलेले हे गाव लोहित आणि सती नदीच्या संगमावर बसलेले आहे.
अतिशय निसर्गसुंदर अश्या या गावात साधारण ३५ लोक राहतात. शेती हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. येथे पर्यटकांना राहण्यासाठी अजून पुरेश्या सुविधा नाहीत. पाटबंधारे विभागाने शेजारच्या वालोंग गावात पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा दिली आहे. वालोंग येथेच १९६२ चे भारत चीन युध्द झाले होते. या ठिकाणी सैन्याचा मोठा तळ आहे. डोंगचा सूर्योदय पाहण्यासाठी येथून ८ किमी चा ट्रेक करून जावे लागते.