उन्हाळ्यात सुंदर निसर्ग, प्राचीन मंदिरे आणि शांतता अनुभवण्यासाठी अल्मोडा खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:39 IST2019-03-26T12:29:42+5:302019-03-26T12:39:47+5:30
अल्मोडा हे उत्तराखंडमधील प्राचीन शहर आणि ऐतिहासिक शहर आहे. १६५० मीटर उंचीवर असलेलं हे सुंदर हिल स्टेशन कुमाऊंच्या काही राजांची राजधानी होती.

उन्हाळ्यात सुंदर निसर्ग, प्राचीन मंदिरे आणि शांतता अनुभवण्यासाठी अल्मोडा खास!
(Image Credit : wikipedia)
अल्मोडा हे उत्तराखंडमधील प्राचीन शहर आणि ऐतिहासिक शहर आहे. १६५० मीटर उंचीवर असलेलं हे सुंदर हिल स्टेशन कुमाऊंच्या काही राजांची राजधानी होती. अल्मोडाला उत्तराखंडचं सांस्कृतिक केंद्रही मानलं जातं. येथील लाल बाजारातील रस्त्यांवर फिरणं फारच वेगळा अनुभव असतो. तसेच येथील लाडकाडी छोटी छोटी दुकाने शहराला एक वेगळाच लूक देतात.
नैनीतालपासून ६० किमी अंतरावर असलेल्या या हिल स्टेशनजवळ अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तसेच येथील बाल मिठाई सुद्धा चांगली प्रसिद्ध आहे. जर तुम्ही अशाच वेगळ्या ठिकाणावर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या ठिकाणाचा विचार नक्की करू शकता. चला जाणून घेऊ इथे फिरण्यासाठी १० बेस्ट ठिकाणांबाबत...
१) जोगेश्वर धाम
जोगेश्वर धाम हे अल्मोडामधील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. अल्मोडापासून साधारण ३५ किमी दूर अंतरावर घनदाट जंगलात असलेल्या जोगेश्वरी मंदिरात पोहोचताच एका वेगळ्याच शांततेची जाणिव होते. इथे ७व्या शतकापासून ते १८व्या शतकापर्यंत साधारण १०० पेक्षा अधिक मंदिरे तयार करण्यात आले आहेत.
२) बिनसर
अल्मोडापासून ३० किमी अंतरावरील बिनसर 'Wildlife Sanctuary' साठी लोकप्रिय आहे. घनदाट झाडांनी वेढलेल्या डोंगरांत आणि निसर्ग सौंदर्यात वसलेले बिनसर प्रसिद्ध आहे. बिनसरहून तुम्ही हिमालयाची नंदा देवी, त्रिशुली, पंचाचुली, नंदाकोटी यांसारखे डोंगरही बघू शकता.
३) राणीखेत
राणीखेत हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानलं जातं. हे ठिकाण अल्मोडामधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. ब्रिटीश काळात इंग्रज इथे उन्हाळ्यात फिरायला येत होते. सुंदर स्वच्छ रस्ते, गोल्फकोर्स, सेनेचं म्युझिअम, फळांच्या बागा आणि प्राचीन मंदिरे राणीखेतला वेगळं रूप देतात.
४) चितई मंदिर
हे मंदिर गोलू देवतेला समर्पित आहे. इथे लोक देवाला चिठ्ठी लिहून आपल्या इच्छा सांगतात. त्यामुळे इथे तुम्हाला लाखोंच्या संख्येने चिठ्ठ्या बघायला मिळतील. हे ठिकाण अल्मोडापासून ८ किमी अंतरावर आहे.
५) शीतलाखेत
शहराच्या धावपळीपासून दूर जाण्यासाठी एका वेगळ्या ठिकाणाचा शोध घेत असाल तर हे ठिकाण बेस्ट आहे. इथे तुम्हाला केवळ आणि केवळ शांतता अनुभवायला मिळेल. हे ठिकाण राणीखेतपासून ३० किमी अंतरावर आहे. शुद्ध हवा, शांत वातावरण, पक्षांची चिवचिवाट, झोपेतून उठल्या उठल्या डोळ्यांसमोर हिरवीगार झाडे हे दृश्य तुमचं मन प्रसन्न करणारं असेल.
६) Bright End Corner
अल्मोडापासून साधारण २ किमी अंतरावर 'Bright End Corner' हे ठिकाण सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा बघण्यासाठी लोकप्रिय आहे.
७) कसार देवी मंदिर
कसार देवी मंदिर हे अल्मोडापासून साधारण ८ किमी दूर आहे. कश्यप पर्वतावर असलेलं हे मंदिर दुसऱ्या शतकात तयार करण्यात आलं होतं.
८) Zero Point
बिनसर अभयारण्यात Zero Point एक टॉवर आहे. या टॉवरवरून नंदा देवी आणि केदारनाथ पर्वताचा शानदार नजारा दिसतो. साधारण २४०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणावर ट्रेकिंग करून पोहोचलं जातं.
कसे जाल?
अल्मोडा येथे जाण्यासाठी रेल्वेने काठगोदाम किंवा रामनगरपर्यंत जावं लागेल. तेथून बस किंवा टॅक्सीने ३ ते ४ तासांचा प्रवास करून तुम्ही अल्मोडाला पोहोचू शकाल.
कधी जाल?
अल्मोडा जाण्यासाठी मार्च ते जून आणि त्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी योग्य मानला जातो. जुलै ते ऑगस्टमध्ये इथे फार जोरदार पाऊस असतो.