उल्हासनगरात शहर विकास आराखड्याचे नियम पायदळी तुडवत १५० कोटीच्या निधीतून बनले 'झिकझॅक' रस्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:26 IST2025-11-03T19:24:54+5:302025-11-03T19:26:44+5:30
उल्हासनगरात गेल्या तीन वर्षापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून १५० कोटीच्या निधीतून प्रमुख ७ रस्त्याचे काम सुरू आहे.

उल्हासनगरात शहर विकास आराखड्याचे नियम पायदळी तुडवत १५० कोटीच्या निधीतून बनले 'झिकझॅक' रस्ते
-सदानंद नाईक, उल्हासनगर
उल्हासनगर शहर विकास आराखड्याच्या नियमाला पायदळी तुडवत शहरात १५० कोटीच्या निधीतून प्रमुख ७ रस्त्यांचे बांधकाम एमएमआरडीएच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षापासून सुरू आहे. जशी व जिथे जागा मिळेल, त्याप्रमाणे झिकझॅक पद्धतीने रस्ते बांधण्यात आल्याची टीका होत असून याप्रकाराने बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला.
उल्हासनगरात गेल्या तीन वर्षापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून १५० कोटीच्या निधीतून प्रमुख ७ रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्ते पूर्ण आल्यावर शहर सुसाट होणार असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात बनविण्यात येणारे रस्ते डीपीच्या नियमानुसार होणे शहर हिताचे आहे. मात्र तसे न होता रस्त्याला जशी जागा मिळेल. तसे रस्ते झिकझॅक पद्धतीने रस्ते बांधण्यात येत असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
महापालिका बांधकाम विभागाने शहर विकास आराखडाच्या नियमानुसार रस्ते बनविले जात नसल्याची कबुली दिली. मग कोणाला वाचविण्यासाठी रस्ते डीपीच्या नियमानुसार न बांधता झिकझॅक पद्धतीने बांधले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शांतीनगर ते डॉल्फिन मार्गे सीब्लॉक शहाड रेल्वे स्टेशनला जोडणारा रिंग रोड डीपीनुसार १२० फुटाचा आहे. प्रत्यक्षात रस्ता जेमतेम ५० ते ६० फूट रुंदीचा बनविण्यात आल्याचे उघड झाले.
डीपी आराखडा फक्त कागदावर
उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 'रिंग रोड' महत्त्वाचा मानला जातो. विकास आराखड्यात शांतीनगर डॉल्फिन रस्ता १२० फूट रुंदीचा आहे. परंतु, जागेच्या उपलब्धतेनुसार रस्ता बांधण्यात आल्याची टिका सर्वपाक्षिय नेत्याकडून होत आहे.
रस्त्यावर विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर
एमएमआरडीएने रस्ता बांधताना रस्त्याला बाधित होणाऱ्या विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर बाजूला हलवणे गरजेचे आहे. मात्र रस्त्यात विजेचे खांब व ट्रान्सफॉर्मर उभे असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
शहाड पूल बंद, रिंग रोड पर्यायी मार्ग
शहाड पूल दुरुस्तीसाठी गेली १५ दिवस बंद राहणार असून पर्यायी रस्ता म्हणून शहरातील रिंग रोडचा वापर होणार आहे. शांतीनगर ते डॉल्फिन मार्गे शहाड रेल्वे स्टेशन रस्त्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र रस्ता अद्याप अर्धवट बांधण्यात आला असून रस्त्यावर विजेचे खांब ट्रांसफॉर्मर आहेत.
डीपीनुसार रस्त्याची बांधणी नाही
एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेले प्रमुख ७ रस्ते हे डीपीनुसार बांधण्यात आले नाही. रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याला मार्किंग दिली होती. मात्र कारवाई झाली नाही.