जितेंद्र कालेकर
कधीकाळी खेळाडूंच्या उत्साहाने दुमदुमणारे ठाण्याचे ऐतिहासिक गावदेवी मैदान बुधवारी दुपारी रक्ताने माखले. क्रिकेट खेळताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि त्यात एका २६ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. रोहित मोरे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
ठाण्यातील खारटन रोड भागात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गावदेवी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना तिथे हरीश नावाच्या मुलाचा रोहित पटनेशा (२४) आणि विष्णू चव्हाण (२४) यांच्याशी वाद झाला. या वादातून पटनेशा आणि चव्हाण यांनी हरीशला मारहाण करण्यास सुरुवात केली.
शाब्दिक चकमक आणि रक्तरंजित शेवट
या मारहाणीची माहिती मिळताच रोहित मोरे आणि त्याचा मित्र अमित किर (२७) हे तिथे मध्यस्थी करण्यासाठी पोहोचले. मात्र, आरोपी पटनेशा आणि चव्हाण यांचा राग अनावर झाला होता. त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आणि संतापलेल्या आरोपींनी धारदार चाकूने रोहित मोरे आणि अमितवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान रोहित मोरे याचा मृत्यू झाला.
आरोपींना अवघ्या काही तासांत बेड्या
हत्येच्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून नौपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांतच आरोपी रोहित पटनेशा आणि विष्णू चव्हाण यांना अटक केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अमित किरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Summary : A 26-year-old was murdered in Thane following a cricket argument. Rohit More died after being stabbed. Naupada police arrested Rohit Patnesha and Vishnu Chavan. Another person is injured.
Web Summary : ठाणे में क्रिकेट विवाद के चलते 26 वर्षीय युवक की हत्या कर दी गई। रोहित मोरे की चाकू मारकर हत्या। नौपाड़ा पुलिस ने रोहित पटनेशा और विष्णु चव्हाण को गिरफ्तार किया। एक अन्य व्यक्ति घायल है।