जागतिक अभियंता दिनी भिवंडीतील रस्ते बनविणारे अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 18:01 IST2021-09-15T17:59:09+5:302021-09-15T18:01:05+5:30
Engineer's Day And Bhiwandi Potholes : वंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनकडे अशा रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर धारेवर धरत ट्रॉल केले.

जागतिक अभियंता दिनी भिवंडीतील रस्ते बनविणारे अभियंते सोशल मीडियावर झाले ट्रोल
नितिन पंडीत
भिवंडी - आज जागतिक अभियंता दिन असल्याने सोशल मीडियावरून जगभरातील सर्वच क्षेत्रातील अभियंत्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र भिवंडी शहरातील मनपा व टोल प्रशासनकडे अशा सर्वच रस्त्यांची सध्या अत्यंत दुरावस्था झाल्याने भिवंडीकरांनी जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून भिवंडीतील रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरत ट्रॉल केले आहे. भिवंडीतील रस्ते बनविणारे इंजिनियर सोडून बाकी सर्वांना जागतिक अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाच्या शुभेच्छा अनेक भिवंडीकरांच्या व्हॉट्सअॅप स्टेट्स बरोबरच व्हॉट्सअॅप ग्रुपवर आज दिवसभर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
भिवंडी शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून येथील उड्डाणपुलांवर देखील मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तर भिवंडीत असलेल्या कशेळी अंजूरफाटा, माणकोली चिंचोटी, भिवंडी वाडा, भिवंडी कल्याण, मुंबई नाशिक महामार्ग या सर्वच टोल रस्त्यांवर देखील मोठ्याप्रमाणात खाद्याचे साम्राज्य पसरल्याने भिवंडीकरांना खड्ड्यांचा व रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने हे रस्ते बनविणारे अभियंते नेमकी काय पद्धतीने व गुणवत्तेने येथील रस्ते बनवितात असा सवाल उपस्थित करीत भिवंडीकरांनी आज जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून येथील खड्डेमय रस्ते बनविणाऱ्या अभियंत्यांना सोडून इतर सर्व अभियंत्यांना जागतिक अभियंता दिनाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. भिवंडीकरांच्या या अनोख्या शुभेच्छा मनपा प्रशासनातील अभियंत्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या चांगल्याच जिव्हारी लागल्या असाव्या एवढे मात्र नक्की.