वाढवणजवळ सुमारे १,२०० एकर जागेवर उभारणार जगातील सर्वोत्तम कृषी बाजारपेठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:29 IST2026-03-31T13:29:16+5:302026-03-31T13:29:16+5:30
पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

वाढवणजवळ सुमारे १,२०० एकर जागेवर उभारणार जगातील सर्वोत्तम कृषी बाजारपेठ
मुंबई: आधुनिक, सुसज्ज जागतिक दर्जाची बाजार साखळी उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात वाढवण पोर्ट येथे १,२०० एकरवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उभारण्यात येईल. ही बाजारपेठ रस्ता, रेल्वे, बंदर व विमानतळाशी जोडलेली असेल, ज्यामुळे शेतीमालासाठी महाराष्ट्र जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास पणनमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
'शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ' उभी राहिली
राज्यात शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) या केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ असल्याचे मंत्री रावल यांनी नमूद केले.
लहान शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना बाजारपेठेत सक्षमपणे उभे करण्यासाठी या संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कृषी पणन मंडळ व महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र येथे शेतकरी उत्पादक संस्थांच्या परिषदेचे उद्घाटन रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी रावल यांनी राज्या सध्या अस्तित्वात असलेल्या कृषी व्यवस्थेपेक्षा आधुनिक अशी बाजार साखळी उभारण्याची गरज व्यक्त केली.
उत्पादनासह ब्रडिंग, पॅकेजिंगही महत्त्वाचे
बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रेडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.