मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 05:38 PM2017-12-05T17:38:20+5:302017-12-05T17:38:38+5:30

Workshop on Good and Bad Touch of school students in Mira Road | मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न

मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न

googlenewsNext

राजू काळे
भार्इंदर - शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सतत वाढत असून त्यावेळी विद्यार्थ्यांना होणारे स्पर्श कसे ओळखायचे व त्याची माहिती मोकळेपणाने शिक्षक अथवा मुख्याध्यापक, पालकांना त्वरित कशी द्यावी, यावर मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासगी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुड व बॅड टच या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक कोवळ्या जिवांचा लैंगिक शोषणापायी हकनाक बळी गेला आहे. याला कोण जबाबदार, हा प्रश्न मात्र सर्वच स्तरावर निरुत्तरीत करणारा ठरतो. अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना देशात वाढत आहेत. अनेकदा त्यात घरातील वासनांध मंडळींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. याखेरीज जवळचे नातेवाईक, शेजारी, शाळेतील कर्मचारी आदींकडूनही लहान बालकांचे लैंगिक शोषण केले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी शाळा प्रशासनापासून पोलिस, शिक्षक व पालकांपर्यंत अशा सर्वच स्तरातील लोकांनी जागरूकपणे प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासगी रुग्णालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी गुड व बॅड टच कसा ओळखावा, या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत मुलांसाठी मानसोपचार तज्ञ डॉ. धनजंय गंभीरे तर मुलींसाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ. स्मिता मूर्ती यांनी सहभागी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. यावेळी डॉ. धनजंय गंभीरे यांनी, लहान मुलांना एखाद्याचा स्पर्श चांगला आहे की वाईट हेतूने आहे, हे समजणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. हा विषय मुलांना समजावणे किंवा त्याचे त्यांना आकलन करुन देणे, हे अवघड असले तरी किमान त्या सवयीच्या लोकांपासून त्यांना सावध राहणे गरजेचे आहे, किमान इथपर्यंतचे भान त्यांच्यामध्ये निर्माण करणे आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. स्मिता मूर्ती यांनी, काही मुलांना खास करून मुलींना खोदून खोदून विचारले तरी शाळेत किंवा घराबाहेर काय घडले हे सांगण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. अशावेळी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबाबतीत काय घडले, हे जाणून घेण्याची जबाबदारी पालकांची ठरत असल्याचे सांगितले. मुलींची कोणी छेड काढली, त्यांना कोणी अश्लिल भाषेत निर्देश केले, त्यांच्याशी त्या भाषेत संभाषण केल्यास त्यांनी त्याची माहिती पालकांना त्वरित देणे, अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ही भावना मुलींमध्ये वाढविण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. तसेच लहान वयात अनेक लैंगिक प्रश्न निर्माण होत असल्याने त्या प्रश्नांवरील संभ्रम कार्यशाळेतील चर्चेद्वारे दूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेत ८ ते १५ वर्षे वयोगटातील ९० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. या विषयावर मोफत कार्यशाळा घेण्यास उत्सुक असलेल्या शाळांनी ९२२३४०५१९७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Workshop on Good and Bad Touch of school students in Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.