‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे अर्धे युद्ध जिंकले, सर्व्हे केलेल्या १९.४८ लाख ठाणेकरांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:13 IST2020-10-18T12:13:25+5:302020-10-18T12:13:58+5:30
या अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ९ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या पंधरवड्यात केलेल्या सर्व्हेमध्ये महापालिकेने रोज सरासरी ८० ते ९० हजार लोकांचा सर्व्हे केला. (Corona test)

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे अर्धे युद्ध जिंकले, सर्व्हे केलेल्या १९.४८ लाख ठाणेकरांची होणार तपासणी
ठाणे :ठाणे महानगरपालिकेने माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १९ लाख ४८ हजार १०२ जणांचा सर्व्हे करण्याचे धनुष्य पेलण्याचे काम केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या या कुटुंबांना भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना उपचाराच्या कक्षेत आणले जाणार आहे.
या अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता ९ ऑक्टोबर रोजी झाली. पहिल्या पंधरवड्यात केलेल्या सर्व्हेमध्ये महापालिकेने रोज सरासरी ८० ते ९० हजार लोकांचा सर्व्हे केला. सात लाख सात हजार ९४६ कुटुंबांचा सर्व्हे करून या कुटुंबातील १९ लाख ४८ हजार १०२ जणांच्या पालिकेकडे नोंदी करून घेतल्या. यासाठी रोज ५००-५५० जणांचे पथक हे लोकांच्या घरोघरी जाऊन हे काम करीत होते. यात भेटी दिलेल्या कुटुंबीयांची पूर्ण माहिती नोंद करून घेतली असून आता दुसऱ्या टप्प्यात अगोदर भेटी दिलेल्या कुटुंबांना भेटून त्यांच्या कुटुंबातील आजारी माणसांची माहिती घेतली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात भेटी दिलेल्या व्यक्तींना भेटून १५ दिवसांत त्यांच्या घरात कोणी आजारी पडले आहे का, अथवा कोणाला काही लक्षणे आढळली आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसे कोणी आढळल्यास त्याला आवश्यक ती मदत केली जाणार आहे. या कुटुंबातील सगळ्यांची नोंदणी झाल्याने त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, पुढील फॉलोअप करणे सोपे जाणार आहे.
गुरुवारपासून दुसरा टप्पा -
गुरुवार, १५ ऑक्टोबरपासून ठाण्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा १५ दिवसांचा असणार आहे. दरम्यान, पहिल्या सर्व्हेत आढळलेल्या कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरसुद्धा रुग्णांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या १५ दिवसांच्या काळात महापालिकेच्या पथकांनी ६० हजारांहून अधिक इतर आजारांचे रुग्ण शोधून त्यांनाही आवश्यक ते सल्ले देऊन मदत केली आहे.