Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:29 IST2020-03-08T00:29:42+5:302020-03-08T00:29:56+5:30
दोन एकरांत घेतले विविध उत्पादन, जांभा नदीच्या पाण्याचा केला वापर

Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा
जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित केला जात असला, तरी या शेतीच्या उत्पादनात महिलांचाही तितकाच वाटा आहे हेही तितकेच सत्य आहे. दिवसरात्र एक करून आपले भविष्य बदलून टाकण्याची किमया एका महिलेने केली आहे. नडगाव येथील सुरेखा सुरेश फर्डे यांच्या घरची परिस्थिती बेताची; पण त्यावर मात करण्यासाठी मेहनत करण्याची तिची तयारी होती.
शेतीजवळून जांभा नदी वाहत असल्याने त्याचा फायदा घेत आपल्या या जागेत भाजीपाला उत्पादन घेण्याचे ठरविले. पतीच्या बरोबरीने शेतीच्या कामाला सुरु वात केली. शेतात पाणी आणले आणि ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून आपल्या शेतात काकडी, भोपळा, शिरोळे, कारली, दुधी आणि डांगर यांची लागवड केली. मागील तीन वर्षांपासून त्या मेहनत घेऊन त्यांनी आपल्या घराला स्थैर्य प्राप्त करून दिले. पती सुरेश यांनीही, आपल्या यशात पत्नीचाच अधिक वाटा असून तिच्या दिवसरात्र मेहनतीमुळे मलाही अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले.
दोन एकरमध्ये ४०० किलो काकडी, ५०० किलो कारली, २०० किलो भोपळा, २०० किलो शिरोळे, १५० किलो दुधी आणि महत्त्वपूर्ण अशी डांगराची लागवड केली असल्याने अधिक फायदा होतो. दरवर्षी अशा प्रकारच्या भाजीपाल्याची शेती केल्याने होणाऱ्या फायद्यामुळे घराची घडी बदलण्यास मदत झाली आहे.यामुळे आम्ही समाधानी आहोत असे त्या म्हणाल्या.
ठिबक सिंचनाने केली लागवड
शेतात ठिबक सिंचनाच्या मदतीने लागवड केली असून, त्याला सेंद्रिय खतांची जोड दिल्याने आज भाजीपाला जोराने बहरला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत अधिक फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आज शेती करण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसत आहे. शेती करणे परवडत नाही, अशीच ओरड होते. मात्र, शेतीत अनेक प्रकारचे उत्पादन घेतल्यास नक्कीच फायदा होतो, हे सुरेखा यांनी दाखवून दिले आहे.