देवाचा प्रसाद म्हणून मुलांना दिले विष; मुलीची हत्या करुन आईने स्वतःला संपवले, मुलगा बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:12 IST2025-10-14T18:10:58+5:302025-10-14T18:12:55+5:30
ठाण्यात एका महिलेने मुलीची हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

देवाचा प्रसाद म्हणून मुलांना दिले विष; मुलीची हत्या करुन आईने स्वतःला संपवले, मुलगा बचावला
Thane Crime : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैफल्यग्रस्त रेखा राजेंद्र जैन (३९) हिने मुलगी खुशी (१९), मुलगा दक्ष (१८) यांना प्रसाद, अंगाऱ्यातून विषारी द्रव्य पाजून स्वतःही विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेत मुलीचाही मृत्यू झाला. संशय आल्याने मुलाने प्रसाद फेकला. त्यामुळे तो बचावला. या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी सोमवारी दिली.
वागळे इस्टेट भागात राजेंद्र जैन (३९) याचे भंगार विक्रीचे दुकान आहे. त्याची पत्नी २०२३ पासून मानसिक आजाराने त्रस्त होती. यातूनच होत असलेल्या कौटुंबिक कलहातून वैफल्यग्रस्त झाली होती. या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवाचा प्रसाद म्हणून मुलांना दिला
२ ऑक्टोबर रोजी ती तिच्या राजस्थानातील सासर आणि माहेर असलेल्या गावी गेली होती. ८ ऑक्टोबर रोजी ती परतली होती. त्याचदिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिने आधी मुलीला आणि नंतर मुलाला जबरदस्तीने देवाचा प्रसाद असल्याचे सांगत अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास दिला. मात्र कडवट चव लागल्याने दक्षने प्रसाद गिळला नाही. काही वेळानंतर मुलाने वडिलांना बोलावले आणि आई बेडरूमध्ये असल्याचे सांगितले. त्याने खिडकीच्या झडपेतून पाहिले असता खुशीला उलटी झाली, तर बाथरूममध्ये रेखा अंघोळ करीत होती. तिला जाब विचारले असता तिने घडलेला प्रसंग पतीला सांगितला. त्या दोघींनाही परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी तिचा आणि खुशीचा मृत्यू झाला.