अंबरनाथमध्ये ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:31 IST2025-10-20T04:31:25+5:302025-10-20T04:31:58+5:30
रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे तिचा छाया रुग्णालयातच मृत्यू ओढावला.

अंबरनाथमध्ये ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा मृत्यू
ठाणे : अंबरनाथ स्वामी नगर परिसरात एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला उपचारासाठी अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ पुढच्या उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याची गरज होती. मात्र तिला रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे तिचा छाया रुग्णालयातच मृत्यू ओढावला.
अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या मीना सूर्यवंशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवून तिला स्थिर करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला लागलीच दुसऱ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. मात्र रुग्णालयात असलेली रुग्णवाहिका ही नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आलेल्या व्हीआयपीच्या सुरक्षा ताफ्यात ऑन ड्युटी असल्यामुळे ती रुग्णालयात आलीच नाही. त्यामुळे मृत्यूची झुंज देणाऱ्या त्या महिलेला उपचारासाठी पुढे हलविता आले नाही. काही कालावधीनंतर त्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
संबंधित महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून तिची साधी देखरेख करण्यासाठी देखील त्यांचे कुटुंबीय पुढे नव्हते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान या महिलेच्या मृत्यूस नेमके जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.