कल्याणमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेला अटक: सहा महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 17:21 IST2018-02-16T17:14:08+5:302018-02-16T17:21:24+5:30

पैशाचे अमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ चालविणा-या एका महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याणमधून गुरुवारी रात्री अटक केली. तिच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman arrested for sex racket in Kalyan arrested: Six women released | कल्याणमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेला अटक: सहा महिलांची सुटका

कल्याणमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या महिलेला अटक

ठळक मुद्देपैशाचे अमिषाने जाळयात ओढायचीठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईहॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी केली अटक

ठाणे : परिस्थितीने असहाय असलेल्या महिला तसेच तरुणींना हेरून त्यांना पैशाचे आणि नोकरीचे अमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ मध्ये ओढणा-या वंदना चव्हाण या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून गुरुवारी रात्री अटक केली. तिच्या ताब्यातून सहा पिडीत महिलांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या एका खासगी शाकाहारी हॉटेलमध्ये वंदना नावाची महिला दोन हजारांच्या बदल्यात तरुणींना शरीर विक्रयासाठी पुरवित असल्याची ‘टीप’ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाजवळील ‘हॉटेल संतोष रेस्टॉरन्ट’ मध्ये आलेल्या चव्हाण या महिलेकडे बनावट गि-हाईक पाठवून याबाबतची पोलिसांनी खात्री केली. तेंव्हा पैसे मिळताच सहा महिलांना ती घेऊन आली. त्याचवेळी निरीक्षक दौंडकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सतिश वाळके, उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, हवालदार अविनाश बाबरेकर, पोलीस नाईक निशा कारंडे, सरस्वती कांबळे आणि बेबी मशाळ आदींच्या पथकाने तिला अटक केली. तिच्याकडून या २५ ते ३५ वयोगटातील महिलांची सुटका केली. पुण्याच्या अवसरी भागातील ती रहिवाशी असून पतीला दुर्धर आजार असल्यामुळे त्यांना कामधंदा नाही. त्याच मजबुरीने आपण हे काम करीत असल्याचे तिने चौकशीत पोलिसांना सांगितले. दोन हजारांमध्ये ‘सौदा’ पक्का झाल्यानंतर १५०० रुपये ती स्वत:कडे ठेवायची तर या मुलींना ती पाचशे रुपये देऊन त्यांच्याकडून ती हा व्यवसाय करून घेत होती, असेही तपासात उघड झाले आहे. तिच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Woman arrested for sex racket in Kalyan arrested: Six women released