ठाणे परिवहनचे तिकीट वाढणार की कमी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:48 PM2020-02-10T23:48:17+5:302020-02-10T23:48:20+5:30

चेंडू सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात : २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव

Will Thane transportation ticket increase or decrease? | ठाणे परिवहनचे तिकीट वाढणार की कमी होणार ?

ठाणे परिवहनचे तिकीट वाढणार की कमी होणार ?

Next

ठाणे : ठाणे परिवहन प्रशासनाने गेल्या वर्षी प्रस्तावित केलेला २० टक्के तिकीटदरवाढीचा प्रस्ताव यंदाच्या अंदाजपत्रकात पुन्हा आणण्याचा विचार सुरू केला आहे. परंतु, आधीच बेस्ट उपक्रमाने कमी केलेले तिकीटदर, मेट्रोची सुरू असलेली कामे, यांमुळे ३० टक्के उत्पन्नावर झालेला परिणाम आणि इतर प्राधिकरणांचा बसलेला फटका यामुळे टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तिकीटदरवाढ केली, तर प्रवासीसंख्या कमी होऊन उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. यामुळे बेस्टच्या धर्तीवर सत्ताधारी शिवसेना परिवहनचे तिकीट वाढू देणार की कमी करणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेल्या वर्षी सत्ताधारी शिवसेनेने ही दरवाढ फेटाळली होती. पण, उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने परिवहन प्रशासन यंदा भाडेवाढीचा प्रस्ताव पुन्हा अंदाजपत्रकात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.


परिवहनकडे आजघडीला ३५० च्या आसपास बस आहेत. तरीही परिवहनच्या उत्पन्नावर काही महिन्यांत चांगलाच परिणाम झाला आहे. एकीकडे प्रशासन तिकीटदरवाढ करण्याचे प्रस्तावित करीत असताना दुसरीकडे बेस्ट उपक्रमाने त्यांच्या तिकीटदरात घट केली. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला. दीड वर्षांपासून ठाण्यात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे परिवहनच्या ३० टक्के बस कमी झाल्या आहेत. याशिवाय, विविध प्राधिकरणाच्या तसेच खाजगी बस या परिवहनचे प्रवासी पळवत असल्याने त्याचाही परिणाम उत्पन्नावर होऊन ते ३० लाखांवरून २७ लाखांच्या आसपास आले आहे. असे असतानाही चालू आर्थिक वर्षात डिझेल व सीएनजी दरातील लक्षणीय वाढ, परिवहनच्या जुन्या बस यामुळे डिझेलचा होणारा जास्त वापर तसेच जीएसटीमुळे वाहनांचे सुटे भाग खरेदी किमतीत झालेली दरवाढ यामुळे प्रशासनाने भाडेवाढीचा विचार सुरूकेला आहे.

बेस्टचे अनुकरण करणार का ?
परिवहनने भाडेवाढ केल्यास प्रवाशांची संख्या घटून उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होणार आहे. आधीच ते घटले आहे. त्यात आणखी घट होणार आहे. त्यामुळे तिकीटदरात वाढ करण्यापेक्षा ते स्थिर ठेवून किंवा बेस्टने ज्या
पद्धतीने तिकीटदर कमी केले, त्यानुसार दर कमी करून बसची संख्या वाढवून प्रवाशांना चांगली सुविधा दिल्यास परिवहनचे उत्पन्न वाढणार आहे. परंतु, टीएमटी बेस्टचे अनुकरण करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.

सेनेच्या भूमिकेकडे लक्ष : मुंबईत ज्या पद्धतीने बेस्टचे तिकीटदर कमी झाले आहे, त्यानुसार सदस्यांनी परिवहन प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तिकीटदरवाढ कमी करावी, असे सूचित केले आहे. मात्र, कागद पुढे कुठे गहाळ झाला, हे कळू शकलेले नाही. आता सत्ताधारी शिवसेना तिकीटदरवाढ लादू देणार की कमी करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Will Thane transportation ticket increase or decrease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.