अधिकाऱ्यांवर हल्ला खपवून घेणार नाही; आरोपींवर कडक कारवाई करा, मंत्री एकनाथ शिंदेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 00:01 IST2021-08-30T23:57:57+5:302021-08-31T00:01:23+5:30
फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन घेतली भेट

अधिकाऱ्यांवर हल्ला खपवून घेणार नाही; आरोपींवर कडक कारवाई करा, मंत्री एकनाथ शिंदेचे आदेश
ठाणे:- अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली तीन बोटे गमवावी लागलेल्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची त्यानी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल याबाबत त्यांना आशवस्त केले.
ठाण्यात फेरिवाल्याने महापालिका अधिकाऱ्याची बोटे कापली; मनसे संतापली अन् थेट रस्त्यावर उतरली
अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसून या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवल्याविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्या कारवाईला खीळ बसावी यासाठी उद्विग्नतेतून अशी घटना घडली असल्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही ही कारवाई मागे न घेता यापुढेही अनधिकृत फेरीवाल्याविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, इतर पालिका अधिकारी उपस्थित होते.