Will Commissioner Vijay Singhal fulfill the dreams of Thanekar? | ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा आयुक्त विजय सिंघल पेलतील का?

ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा आयुक्त विजय सिंघल पेलतील का?

ठाणे - गेल्या कित्येक महिन्यांपासून बदलीची मागणी करणाऱ्या संजीव जयस्वाल यांना अखेर दिलासा मिळाला असून, त्यांच्या जागी विजय सिंघल यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ते पदाची सूत्रे घेणार आहेत. जयस्वाल यांना कोणतीही पोस्टिंग दिलेली नाही. चार वर्षांत जो काही ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा त्यांनी उभा केला, तो पेलण्याचे आव्हान सिंघल यांच्यापुढे असणार आहे.

आयुक्तपदी सलग पाच वर्षे दोन महिने राहण्याचा विक्रम जयस्वाल यांनी केला. महापालिकेतील अंतर्गत बदल्या रद्द करण्यावरून ते व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या चॅटवरून वादंग निर्माण होऊन त्याचे पडसाद महासभेतदेखील उमटले. त्यानंतर आपल्याला आता ठाणे शहरात राहायचेच नाही, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बदलीची मागणी केली. ती न मिळाल्याने त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडून ठाण्याचा निरोप घेतला.

गुरुवारी आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यापुढे आता जयस्वाल यांनी मागील चार वर्षांत घेतलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार असून, स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजना मार्गी लावण्याचे, महापालिकेवर ३,३०० कोटींचे दायित्व असल्याने नवीन वाटा शोधाव्या लागणार आहेत.

सिंघल यांचा परिचय
सिंघल हे १९९७ चे बॅचचे आयएएस आहेत. त्यांचा प्रवास सहायक जिल्हाधिकारी म्हणून मलकापूर, बुलढाणा येथून सुरु झाला. २००८ ते ११ पर्यंत ते कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त, तर २०११-१४ पर्यंत त्यांनी राज्याच्या साखर आयुक्तपदी काम पाहिले आहे. २०१७ पासून ते मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांची ठिकठिकाणची कारकिर्द चांगली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title: Will Commissioner Vijay Singhal fulfill the dreams of Thanekar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.