सावत्र पित्याच्या हत्येप्रकरणी मुलांसह पत्नीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:01 IST2025-10-28T10:01:58+5:302025-10-28T10:01:58+5:30
ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सावत्र पित्याच्या हत्येप्रकरणी मुलांसह पत्नीला केली अटक
ठाणे / वासिंद : टोकावडे भागात खून करून फेकलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात वासिंदच्या पथकाला यश आले आहे. दारू पिऊन सततच्या शिवीगाळीला वैतागून राजेश शांतीलाल ठक्कर ऊर्फ राजू चाचा ऊर्फ बक्कल (६०,रा. काटेमानीवली, कल्याण) या रिक्षा चालक सावत्र मुलाने व पत्नीने गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नावेद सय्यद (२८), नाजीम (२६) या दाेन सावत्र मुलांसह त्याची दुसरी पत्नी आशा सय्यद (५५) हिला अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांनी साेमवारी दिली. आरोपींना २८ ऑक्टाेबरपर्यंत पोलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुरबाड तालुक्यातील दिवाणपाडा गावालगत अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या उजव्या बाजूला रस्त्यालगत राजेश यांचा मृतदेह ६ ऑक्टाेबर राेजी टोकावडे पाेलिसांना मिळाला हाेता.
दाेरीने गळा आवळल्याचे तपासादरम्यान निष्पन्न
व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या ठिकाणी फेकला हाेता. याप्रकरणी टाेकावडे पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, दीपेश किणी आणि भाऊसाहेब गायकवाड आदींच्या पथकाने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीची तसेच राज्यभरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती काढली. संशयित वाहनांचीही कसून तपासणी केली.
तांत्रिक तपासात खुनाचा उलगडा
अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उपनिरीक्षक कदम यांच्या पथकाला हा मृतदेह राजेश ठक्कर याचा असल्याचे समजले. ठक्कर याचा सावत्र मुलगा नावेद याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता, त्याने त्याची आई आणि भावाच्या मदतीने आपल्या पित्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.