खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:46 IST2020-08-24T16:46:21+5:302020-08-24T16:46:33+5:30
ऍक्टमरा इंजेक्शन हे लाखोंच्या घरात असून ते रुग्णांना मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल
ठाणे : छातीत न्यूमोनियाचा संसर्ग झालेला कोविड बाधित रुग्ण ऍक्टमरा इंजेक्शन न देता बरा होऊ शकत असताना हे महागडे इंजेक्शन देऊन खाजगी रुग्णालयातील डॉकटर या कोविड बधितांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप मनसेने केला. कोविडचा प्रसार झाला आणि त्या नावाखाली खाजगी रुग्णांनी अव्वाच्या सव्वा बिले लावून रुग्णांची लूट सुरू केली. याबाबत मनसेने वेळोवेळी आवाज उठविला.
ऍक्टमरा इंजेक्शन हे लाखोंच्या घरात असून ते रुग्णांना मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कोविड बाधित रुग्ण या इंजेक्शनशिवाय बरा होत असेल तर हे महागडे इंजेक्शन आणण्यासाठी खाजगी डॉक्टरांचा अट्टाहास असतो असे मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. एका कोविड बाधित रुग्णाच्या छातीत न्यूमोनियचा संसर्ग झाला असताना त्याला हे इंजेक्शन लागेल असे कदम यांना सांगण्यात आले. या रुग्णाचे कुटुंब क्वारंटाईन असल्याने कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चार दिवस या इंजेक्शनसाठी धावपळ केली. परंतु कुठेही ते उपलब्ध झाले नाही. या इंजेक्शनविना हा रुग्ण बरा झाला आहे असा दावा कदम यांनी केला.
रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ. शीतल पाठक यांनी सांगितले की, कोविड बाधित रुग्णाच्या छातीत न्यूमोनियाचा संसर्ग अधिक असेल तर या इंजेक्शनची गरज लागते. परंतु सध्या थोडा संसर्ग झाला तरी हे इंजेक्शन देण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. आमच्याकडे दाखल असलेल्या रुग्णाला या इंजेक्शनची गरज होती परंतु ते उपलब्ध होत नसल्याने आम्ही पर्यायी उपचार केले आणि सुदैवाने या रुग्णाला या इंजेक्शनची गरज लागली नाही.
खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल pic.twitter.com/JHZzD4iYpo
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020