हल्ला करण्याची हिंमत येते कुठून?
By अजित मांडके | Updated: January 13, 2025 11:20 IST2025-01-13T10:46:35+5:302025-01-13T11:20:29+5:30
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला.

हल्ला करण्याची हिंमत येते कुठून?
- अजित मांडके
प्रतिनिधी
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. फेरीवाल्यांना पोषक वातावरण निर्माण करण्यात तेथील राजकीय पुढारी, फेरीवाले दादा, दुकानदार आणि बऱ्याच अंशी पालिकेतील हप्ता घेणारे कर्मचारी जबाबदार आहेत. किंबहुना या साखळीमुळेच फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मागील कित्येक वर्षांपासून सर्वच महापालिकांचे फेरीवाला धोरण कागदावर आहे. अशा काही घटना घडल्यानंतर ते अंतिम करण्याची ग्वाही महापालिकेकडून दिली जाते. मात्र, पुन्हा हे धोरण लांबणीवर टाकले जाते.
फेरीवाल्यांची समस्या ही आजची नाही, मागील कित्येक वर्षांपासून ठाणे, कल्याण - डोंबिवली, मीरा - भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर या भागात फेरीवाल्यांचे बस्तान बसल्याचे दिसत आहे. स्टेशन परिसर, गर्दीची ठिकाणे, अरुंद रस्ते, मोकळे फुटपाथ, दुकानदारांसमोरील जागा आदी ठिकाणी फेरीवाले अधिक प्रमाणात दिसतात. ठाणे स्टेशनचा विचार केल्यास या ठिकाणी महापालिकेने तीन सत्रात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथक ठेवले. मात्र, तरीसुद्धा समस्या सुटताना दिसत नाही. बाजारपेठ, मासुंदा तलाव परिसर, वागळे इस्टेट, नौपाडा, कोपरी, लोकमान्यनगर आदींसह शहरातील सर्वच भागात फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. काही फेरीवाले कुर्ला, घाटकोपर येथून आले आहेत. त्यांची दादागिरी वाढताना दिसते.
फेरीवाला दादा हा भाड्याने गाड्या किंवा जागा फेरीवाल्यांना देऊन त्यातून रोजच्या रोज १०० ते २०० रुपये हप्ता प्रत्येक गाडीमागे गोळा करतो. दुकानदार अशा फेरीवाल्यांकडून भाडे घेतात. अतिक्रमण विभागाची गाडी कारवाईसाठी केव्हा येणार, कशी येणार यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेतील काही कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून फेरीवाला दादा किंवा फेरीवाल्यांच्या प्रमुखाच्या मोबाइलवर मेसेज पाठविला जातो.
पालिकेची गाडी कारवाईसाठी येण्यापूर्वीच फेरीवाले आपले सामानसुमान गल्लीत लपवतात. हीच साखळी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असल्याने फेरीवाल्यांचे फावते. एखाद्या अधिकाऱ्याने कारवाई केली तर हप्ता देऊनही कारवाई केल्याने मग फेरीवाला त्या अधिकाऱ्याला मारण्याची हिंमत करतो.
रोजच नवनवीन फेरीवाले वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना त्या भागात मागील कित्येक वर्षे बसत असलेल्या फेरीवाल्यावर नाहक कारवाईचा बडगा उगारला जातो. याला कारणीभूत पालिकेचे अंमलबजावणी न झालेले फेरीवाला धोरण हेच म्हणावे लागणार आहे. आता पालिका अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील आणि पुन्हा ‘जैसे थे’ चित्र दिसणार आहे. परंतु, हा अखेरचा पर्याय असू शकत नाही. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा देऊन फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे असे हल्ले थोपवले जाऊ शकतात.