डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने कधी बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 10:59 PM2020-01-15T22:59:03+5:302020-01-15T22:59:21+5:30

एमआयडीसीतील रहिवासी संघटनेचा सवाल : ‘प्रोबेस’च्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी नाही

When will dangerous chemical plants in Dombivli close? | डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने कधी बंद होणार?

डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने कधी बंद होणार?

Next

मुरलीधर भवार 

कल्याण : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारने धोकादायक रासायनिक कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, हा निर्णय केवळ तारापूरपुरता न घेता डोंबिवलीएमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कारखाने आधी बंद करा, अशी मागणी डोंबिवली औद्योगिक विभागातील रहिवासी संघटनेने केली आहे.

डोंबिवलीमधील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटासंदर्भात राज्य सरकारच्या चौकशी समितीने दिलेला अहवाल सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच त्याची अंमलबजावणीच केली नाही. अहवालाची अंमलबजावणी केली असती, तर कदाचित तारापूर येथील स्फोट टाळता आला असता, याकडे संघटनेचे पदाधिकारी व जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी लक्ष वेधले.

प्रोबेस स्फोटानंतर डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने तातडीने स्थलांतरित करा, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली. मात्र, एखादा उद्योग तातडीने कुठे व कसा स्थलांतरित करायचा, कामगारांचे पुनर्वसन कसे व कुठे करायचे, शिवाय कारखान्याला जागा कुठून व कशी द्यायची. अन्य ठिकाणीही त्याला विरोध होणार नाही, याचीही हमी देता येत नाही. त्यामुळे कारखाने स्थलांतराची मागणी केवळ निवेदनापुरतीच राहिली.

प्रोबेसच्या स्फोटापश्चात डोंबिवली एमआयडीसीत किती धोकादायक कारखाने आहेत, याचा तपशील नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाकडे मागितला होता. या कार्यालयाने नलावडे यांना दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील पाच मोठे कारखाने अतिधोकादायक आहेत. त्यामुळे हे कारखाने बंद करावेत किंवा ते अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी डोंबिवली रहिवासी संघटनेने केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, तारापूर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धोकादायक कारखाने बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. धोकादायक कारखान्यात सुरक्षितता पाळली जात आहे का, याची पाहणी करणे तसेच कारखान्यांच्या सेफ्टी आॅडिटची जबाबदारी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र, ही पाहणी व सेफ्टी आॅडिट केवळ कागदावर केले जाते. त्यामुळेच स्फोटाच्या घटना घडल्यावर नागरिक व कामगारांना त्यांचा जीव गमाविण्याची वेळ येते. अनेक धोकादायक कारखान्यांना त्यांच्यातील त्रुटी दूर करण्याची संधी दिली जाते. मात्र, हे कारखाने त्यात काही सुधारणा न करता केवळ सुधारणा केल्याचे भासवतात. नागरिकांच्या जीवांचे गांभीर्य नसलेले कारखाने बंद केले जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण येथील कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्याने भल्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी अपुरे कर्मचारी-अधिकारी असल्याने पाहणी करून सुरक्षितता कशी पाळणार, असा प्रश्न उपस्थित करत यंत्रणा हात वर करताना दिसतात.

कारखाने अतिधोकादायक असले तरी स्फोटक नाहीत- कामा
धोकादायक रासायनिक कारखाने बंद करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आले असून, याबाबत कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, डोंबिवलीत प्रोबेससारखे कारखाने आता नाहीत. सरकारी यंत्रणांनी माहितीच्या अधिकारात अतिधोकादायक कारखान्यांची यादी दिली असली, तरी तेथे रासायनिक प्रक्रिया करताना अतिदक्षता बाळगली जाते. कारखान्यांचे स्वत:चे सेफ्टी युनिट व सेल रासायनिक प्रक्रिया करताना त्यांची विशेष काळजी घेत आहेत. त्यामुळे आतापर्यंत धोकादायक कारखान्यांत स्फोटाची घटना घडलेली नाही. रासायनिक प्रक्रियेसाठी वापरला जाणारा लहान आकाराचा रिअ‍ॅक्टर १० मिलिमीटर जाडीचा तर, मोठ्या आकाराचा २० मिलिमीटर जाडीचा लोखंडी असतो. अन्य कारखान्यांत तर बॉयलरचा वापर केला जातो. कारखाने अतिधोकादायक असले तरी ते स्फोटक नाहीत, असा दावा सोनी यांनी केला आहे.

Web Title: When will dangerous chemical plants in Dombivli close?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.