ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:57 PM2020-03-23T15:57:15+5:302020-03-23T15:58:04+5:30

राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता.

What do you want Thanekars to do, angry police question | ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय, संतप्त पोलिसांचा सवाल

googlenewsNext

ठाणे   - रविवारचा जनता कर्फ्यूला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर सोमवारी मात्र शहरातील अनेक भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. काहीना काही खोटी कारणे सांगून नागरीक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. राज्यात 144 कलम लागू असतांना शहरात अनेक ठिकाणी याचे उल्लघंन होतांना दिसत होते. त्यामुळे ठाणेकरांनो तुमचे करायचे तरी काय? असा संतप्त सवाल पोलिसांना करावा लागत होता. दुसरीकडे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान, स्टॉल हॉटेल, बार रेस्टॉरन्ट बंद असल्याचे दिसून आले. परंतु घरातून बाहेर पडलेल्या वाहन चालकांना ठाण्याच्या हद्दीवर रोखले जात होते आणि परत घरी पाठविले जात होते.

रविवारी जनता कर्फ्यूला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मात्र सोमवारी याच्या उलट चित्र शहराच्या अनेक भागात दिसून आले सकाळी आनंदनगर टोलनाका या टोलनाक्यावर गाड्यांची रांगा लागल्या होत्या मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेशी निगिडत जाणाऱ्या गाडय़ांना फक्त मुंबई दिशेने रवाना करण्यात आल्या तर बाकीच्या गाड्या पुन्हा ठाण्याला रवाना केल्या जात होत्या. असेच चित्र ठाणो इस्टर्न इम्प्रेस हायवे दिसत होते. ठाण्यातून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आल्या,यावेळी काही लोकांनी पोलिसांना सोबत हुज्जत ही घातला, काहींनी मी सायन्टिस्ट असल्याचे सांगितले, तर काही जण महत्वाचे काम असल्याचे सांगत होते. तर काही नागरिक केवळ मोकळा रस्ता असल्याने बाहेर पडल्याचे सांगत होते. या सर्वाना सुरवातीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनाही काहींना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आल्याचे दिसून आले.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळावा या साठी रेल्वेची सेवा बंद झाली आहे. तसेच शहरातील टीएमटीची सेवा देखील ठराविक काळासाठीच सुरू होती, ती देखील अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु होती. त्यामुळे नागरिकांना आपल्या खाजगी वाहनाचा वापर करीत ठाण्याच्या विविध नाक्यांवर गर्दी केल्याचे दिसत होते. आनंद नगर टोलनाक्यावर तर अधिकची वाहनांची रांग लागली होती. त्यात नागरिकांना समजावतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे नागरिकानी 144 कलम तोडून मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली असतानाच आनंद शनगर चेक नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी लावून अनावश्यक गाड्या परत पाठवल्या. दुसरीकडे शहरातील कॅडबरी, नितीन कंपनी, तीनहात नाका, वर्तकनगर, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, वाघबीळ, कळवा नाका, कोर्ट नाका आदींसह महत्वाच्या नाक्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तरीसुध्दा नागरीक यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. तर शहरातील इतर मार्गावर मात्र वाहनांची संख्या कमी असल्याचे चित्र होते.

दुसरीकडे शहरातील दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आदींसह इतर महत्वाची दुकाने,मॉलसुध्दा बंद होती. केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरु असल्याचे दिसत होते. परंतु त्याठिकाणी देखील सामान घेण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले असतांनाही अशा पध्दतीने नागरींनी गर्दी केल्याने त्याच्यातून धोका कसा टाळायचा असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
 भाजीपाला महागला
वाशीतील एपीएमसी मार्केट बंद झाल्याने मार्केटमध्ये भाजीपाला आलेला नाही. जांभळीचे मार्केट देखील रविवारी बंद होते. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. अनेक ठिकाणी असलेल्या तुरळक भाजी विक्रेत्यांनी भाज्या चढय़ा भावाने विकल्याचे दिसून आले.

Web Title: What do you want Thanekars to do, angry police question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.