ठाण्यात शहरभर उभारणार कचऱ्याचे छोटे-मोठे प्रकल्प
By Admin | Updated: January 7, 2016 00:47 IST2016-01-07T00:47:18+5:302016-01-07T00:47:18+5:30
ठाणे महापालिकेला अद्याप ६५० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंड न मिळाल्याने आता विकेंद्रीकरण करून कचऱ्याची

ठाण्यात शहरभर उभारणार कचऱ्याचे छोटे-मोठे प्रकल्प
ठाणे : ठाणे महापालिकेला अद्याप ६५० मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हक्काचे डम्पिंग ग्राउंड न मिळाल्याने आता विकेंद्रीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, त्यात्या प्रभाग समितीमध्येच कचऱ्याचे विविध स्वरूपाचे २ ते ५ टनांपर्यंतचे प्रकल्प उभारून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्टिंग आणि गांडुळ खत प्रकल्पाचे प्लांट उभारले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेला अद्यापही डायघर येथील डम्पिंग ग्राउंड ताब्यात घेता आलेले नाही. दोन वेळेला या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प हाती घेतले होते. परंतु, स्थानिकांचा होत असलेला विरोध पाहता हे दोन्ही प्रकल्प रखडले. त्यानंतर, तळोजा येथील सामायिक भरावभूमीत ठाणे महापालिका सहभागी झाली होती. परंतु, दराच्या मुद्यावरून एकमत न झाल्याने पालिकेचा हा प्रयोगही फसला.दरम्यान, पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीधारकांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा करून गोळा करीत आहे. त्यानुसार, या मोहिमेत आतापर्यंत १२५ च्या आसपास सोसायट्या सहभागी झाल्या असून त्यातून १०० टन कचरा गोळा होत आहे. या कचऱ्याची त्या प्रभागात विल्हेवाट लावण्यासाठी विकेंद्रीकरण करून प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, २ ते ५ टनांचे हे प्लांट उभारले जाणार आहेत.