वॉर्डनचा वापर दंड ‘वसुली’साठी; अंबरनाथमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:42 AM2019-07-24T00:42:43+5:302019-07-24T00:42:55+5:30

वाहतूककोंडी मात्र जैसे थे, नगराध्यक्षांकडूनही नाराजी

Warden's use of penalty 'recovery' | वॉर्डनचा वापर दंड ‘वसुली’साठी; अंबरनाथमधील प्रकार

वॉर्डनचा वापर दंड ‘वसुली’साठी; अंबरनाथमधील प्रकार

Next

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा नेहमीच वाहतूककोंडीत सापडत असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. त्यांचे मानधनही पालिकेच्या वतीने देण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यांत या वॉर्डनचे काम हे सामाधानकारक दिसत नाही. वाहतूककोंडी शहरात असतानाही काही वाहतूक पोलीस ट्रॅफिक वार्डनना सोबत घेऊन एमआयडीसी रस्त्यावर दंड ‘वसुली’चे काम करत आहेत. कोंडी रोखण्यासाठी दिलेल्या वॉर्डनचा गैरवापर वाहतूक पोलीस करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगराध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण - बदलापूर राज्य महामर्गावर शाळा सुटण्याच्या वेळेत होणारी वाहतूककोंडी ही शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. या कोंडीवरून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वादही होत आहेत. ही कोंडी सोडवण्यात वाहतूक विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोपही होत आहे. वाहतूक विभागाकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्त करण्यात आली आहे. या वॉर्डनचे मानधन पालिकेच्या वतीने दिले जाते. त्यामुळे वॉर्डनकडून कोंडी सुटली जावी, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. मात्र, कोंडी असतानाही कमी कर्मचारी हे वॉर्डनला घेऊन एमआयडीसी भागात दंड ‘वसुली’चे काम करतात.

वॉर्डनची दादागिरी वाढली आहे, ते दुचाकीस्वारांना अडवून त्यांचे लायसन्सही तपासतात. त्यांना अधिकार नसतानाही ते गाड्यांचे कागदपत्र, लायसन्स तपासण्याचे काम करतात. या वॉर्डनला आवरण्याची मागणी होत आहे. वॉर्डनच्या माध्यमातून केवळ वाहतूककोंडी सोडवण्याचे काम करणे अपेक्षित असताना त्यांना वाहतूक विभागाचे अधिकारी इतर कामासाठी वापरत असल्याने त्यांचे मानधन बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कोंडी सोडवण्याचे काम द्या, मगच मानधन
आधी वॉर्डनला वाहतूककोंडी सोडवण्याचे काम द्यावे मगच मानधन दिले जाईल, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.
अंबरनाथमधील पालिका कार्यालयातील चौक, पोलीस स्टेशन चौक आणि विम्को नाका चौकात कोंडी ही नित्याची बाब ठरली आहे. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस हजर राहण्याची मागणी केली जात आहे. वॉर्डनचा गैरवापर सुरू झाल्याने त्याचा फटका शहरातील कोंडीवर होताना दिसत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Web Title: Warden's use of penalty 'recovery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.