Video : व्हिडिओ व्हायरल... दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा स्टंट अंगलट आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 22:35 IST2021-10-26T22:34:20+5:302021-10-26T22:35:26+5:30
कनकिया मुख्य रस्त्याच्या शेवटी एल.आर.तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने तरुण-तरुणींसह व्यसनी उनाडांची वर्दळ असते.

Video : व्हिडिओ व्हायरल... दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा स्टंट अंगलट आला
मीरारोड - सायकल व दुचाकी वरून स्टंटबाजी करणाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न पूर्वी घडलेल्या अपघातांमुळे पोलिसांनी केला होता. परंतु मीरारोडमध्ये कनकिया भागात पोलीस उपायुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरील मुख्य मार्गावर एका रिक्षाचालकाने रात्री चक्क दोन चाकांवर रिक्षा चालवून जीवघेणी थरारक स्टंटबाजी चालवली होती. त्याचा स्टंट पाहून पादचारी व परिसरातील रहिवाश्यांच्या काळजात धस्स होत. त्यामुळे, तक्रारीनंतर अखेर मीरारोड पोलिसांनी त्या स्टंटबाज चालकावर कारवाई केली आहे. त्यामुळे, ही स्टंटबाजी रिक्षाचालकाच्या चांगलीच अंगलट आली.
कनकिया मुख्य रस्त्याच्या शेवटी एल.आर.तिवारी अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील रस्त्यावर मोठ्या संख्येने तरुण-तरुणींसह व्यसनी उनाडांची वर्दळ असते. या भागातील राहिवाश्यानी ह्या व्यसनी व उनाडां विरुद्ध पोलिसांना सतत तक्रारी केल्या आहेत. दुचाकीस्वार तर येथे भरधाव गाड्या पिटाळत असतात. अगदी रात्री उशिरापर्यंत येथे धुडगूस चालत असतो. या ठिकाणी एक रिक्षाचालक तरुण तर चक्क दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट करत असतो. अन्य वाहन चालक, पादचारी व रहिवाशीदेखील श्वास रोखून त्या रिक्षा चालकाचा तो थरारक स्टंट स्तब्ध होऊन पहात असतात. पण, जीवघेण्या धोकादायक स्टंटबद्दल नागरिकांचा विरोध असून कारवाईची मागणी होत होती. त्यातूनच, पोलिसांनी दखल घेत रिक्षाचालकावर कारवाई केली.
दोन चाकांवर रिक्षा चालवण्याचा स्टंट अंगलट, पोलीस कारवाई झाली pic.twitter.com/frD3F465Um
— Lokmat (@lokmat) October 26, 2021