दुष्काळग्रस्त पशुधनासाठी मुंबईतील पशुवैद्यकांचा हातभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:26 IST2019-09-10T00:26:38+5:302019-09-10T00:26:56+5:30
२०० जनावरांना देणार पशुखाद्य : १५ सप्टेंबर रोजी भेट देणार

दुष्काळग्रस्त पशुधनासाठी मुंबईतील पशुवैद्यकांचा हातभार
ठाणे : पूरग्रस्तांपाठोपाठ आता कोल्हापूर-सांगली परिसरातीलच जनावरांसाठी मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन मुंबईतील पशुवैद्यकांनी मदतीचा हात देऊन निवडलेल्या २०० जनावरांच्या छावणीला येत्या १५ सप्टेंबर रोजी भेट देणार आहे. यावेळी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची संघटना (बोव्हेट ग्लोरी) व माजी विद्यार्थी संघटना (बोव्हेट १९७४-७८) आणि मुंबईस्थित पाळीव प्राण्यांसाठीची वैद्यकीय संघटना (पीपीएएम) या संघटना पशुखाद्यासह औषधे आणि त्या जनावरांची तपासणी करणार आहेत.
डॉ. सुभाष चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने डॉ. आनंदराव माळी, डॉ. सुहास राणे व डॉ. प्रशांत बिराजदार असे पशुवैद्यकांचे पथक गठीत केले असून साताऱ्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व माण तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. आरिफ इनामदार यांच्या सहकार्याने रविवारी दिवडी, तालुका माण येथील चारा छावणीतील २०० जनावरांना मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुखाद्याच्या १० किलोच्या २०० पिशव्या, प्रत्येकी एक किलो चिलेटेड खनिजाच्या २०० पिशव्या व या सर्व जनावरांना जंतनिवारक औषधे दिली जाणार आहेत.
औषधांचा साठा देणार
महापुराचा तडाखा बसलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जनावरांना दुग्धोत्पादनासाठी द्रवरूप कॅल्शियम, भूक वाढण्यासाठी लिव्हर टॉनिक व उष्माघातापासून संरक्षणासाठी उत्साहवर्धक औषधांचा साठा उपलब्ध केला जाणार आहे.