दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण, जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 00:35 IST2021-05-07T00:35:39+5:302021-05-07T00:35:58+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ : केवळ १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण

दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण, जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इतर कुठेही लस मिळत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गुरुवारी रांगा लावल्या होत्या. परंतु, त्याठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठीच लसीकरण सुरु असल्याने तासन तास रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठांना घरची वाट धरावी लागली. यामुळे दोन तासाहून अधिक काळ गोंधळ निर्माण झाला होता.
गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोव्हॅक्सिनच्या लसीकरणास सुरुवात झाली. एक दिवस आधीच रुग्णालय प्रशासनाने सोशल मीडियावर गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण असल्याने दुसरा डोस घेण्यासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन करूनही पहाटेपासूनच शासकीय रुग्णालयाबाहेर ज्येष्ठांनी रांगा लावल्या होत्या. कर्मचाऱ्यांकडून आज तुमचे लसीकरण नसल्याचे सांगितले जात असतानाही ज्येष्ठांनी गोंधळ घातला. त्यांचा राग रास्तच होता. काहींना पहिला डोस घेऊन दीड महिना उलटला होता. यावरुन रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांमध्ये वादही झाला. एका महिलेला दोन महिने झाले असतानाही लस मिळू शकलेली नाही. मुलुंड, भांडुप तसेच इतर ठिकाणाचेही ज्येष्ठ नागरिक येथे आले होते.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात होते. तर इतर १८ ठिकाणी कोव्हीशिल्डचा दुसरा डोस दिला जात होता. त्यामुळे लस मिळविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या केंद्रावरदेखील गर्दी केली होती. परंतु, प्रत्येक केंद्र केवळ दोन तासच सुरू ठेवण्यात आल्याने प्रत्येक केंद्राबाहेर लांबच लांब रांगा होत्या.
पहाटेपासून उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अखेर मनधरणी केली. नगरसेवक सुधीर कोकाटे आणि जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी आमच्याकडे लसच येत नसल्याने आम्ही तरी काय करणार असे सांगितले.
लसींचा अपुरा साठा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, यापुढे लस जशा उपलब्ध होतील तसे तुम्हाला फोन करून बोलवले जाईल, असे आश्वासन दिले.
यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपला मोबाइल नंबर देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपला मोबाइल क्रमांक रजिस्टरमध्ये लिहिला. लस न घेता परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पहिल्यांदा असे झाले की लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना पुन्हा घरी पाठवण्याची वेळ आली आहे. लसीचा साठा उपलब्ध असताना त्याचा डोस येणाऱ्या नागरिकांना दिला गेला आहे. गुरुवारी पहाटेपासून नागरिकांची प्रचंड झालेली गर्दी आणि ते सांगून ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना बोलवावे लागले. गुरुवारी फक्त १८ ते ४४ या वयोगटातील ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला.
- डॉ. कैलास पवार,
जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे