ठाण्यातील नौपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी व्यंकट आंधळे; जयंत बजबळे यांच्याकडे वर्तकनगरची सूत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 23:54 IST2021-07-20T23:51:38+5:302021-07-20T23:54:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डान्सबार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या नौपाडा आणि वर्तकनगर सहायक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला ...

दोन सहाय्यक आयुक्तांसह दोन निरीक्षकांना डान्सबार प्रकरण भोवले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डान्सबार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या नौपाडा आणि वर्तकनगर सहायक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आता नौपाडा विभागाची अतिरिक्त सूत्रे कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्याकडे तर वर्तकनगर विभागाची अतिरिक्त सूत्रे वागळे इस्टेट विभागाचे जयंत बजबळे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सोमवारी रात्री काढले आहेत.
ठाणे शहरातील नौपाडा विभागातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस तसेच वर्तकनगर विभागातील नटराज या तीन बारमध्ये कोरोना संबंधिचे नियम पायदळी तुडवून ते सर्रासपणे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची बाब समोर आली. याची थेट राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली. त्यामुळेच पोलीस आयुक्त सिंह यांनी नौपाडा विभागाच्या नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे अनिल मांगले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता वर्तकनगरमध्ये त्याच पोलीस ठाण्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे दिली आहेत. तर नौपाडा पोलीस ठाण्याचीही सूत्रे त्याच पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभाग सांभाळणाºया रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पूरत्या स्वरुपात सोपविण्याचे आदेश ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे यांनी काढले आहेत. घाटेकर आणि क्षीरसागर यांनी मंगळवारी आपल्या नविन पदाची सूत्रेही घेतली आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याचेही या आदेशामध्ये म्हटले आहे.