Eknath Shinde: कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:11 IST2022-01-08T17:11:00+5:302022-01-08T17:11:32+5:30
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या.

Eknath Shinde: कोरोना परिस्थितीचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतला आढावा
मुंबई :-
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. कोव्हिड बाधित रुग्ण नॉन-कोव्हिड खासगी रुग्णालयात आल्यास त्याला प्रथम दाखल करून त्याची प्रकृती स्थिर करून मगच इतर रुग्णालयात हलवावे, तसेच शक्य असल्यास त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात असूनही ऑनलाईन व्हीसीद्वारे विशेष आढावा बैठक घेऊन एमएमआर क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला. एमएमआर क्षेत्रातील नागरिकांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णालयाची गरज मर्यादित असली तरीही आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी साऱ्या सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी या बैठकीत दिले. एमएमआर क्षेत्रातील सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालये, तसेच कोरोना केंद्र सज्ज करून ठेवण्याचे निर्देश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले. त्यासोबतच या रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटचा पुन्हा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नियमितपणे कॉल सेंटर्सच्या माध्यमातून ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग होईल, याबाबत दक्ष राहण्यास त्यांनी सांगितले. डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ यांना देखील मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
ओमयक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी त्यासाठी लागणारी मालोपेरावीर, व्हिटॅमिन सप्लिमेंट, पॅरासिटामॉलच्या गोळ्या यांचा पुरेसा साठा करून ठेवण्याबाबत त्यांनी सर्व मनपा आयुक्तांना सूचना दिल्या. त्यासोबतच ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट, ऑक्सिजन काँसंट्रेटर, याची सज्जता करून ठेवावे असेही त्यांनी निर्देश दिले. आज जरी बेड्सची गरज फार नसली तरीही भविष्यात ते वाढवावे लागले तर त्यासाठी संभाव्य जागा शोधून ठेवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे काम एअरपोर्ट अथॉरिटी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. सर्व मनपा हद्दीत बाहेरून होणाऱ्या या प्रसाराबाबत अधिक दक्ष राहावे, यासाठी अशा प्रवाशांची माहिती घेऊन त्यांना वेळीच क्वारंटाइन करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेने यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी सूचना देखील श्री शिंदे यांनी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याचे शक्य ते सारे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत. कोरोनाबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केल्यास ही परिस्थिती हाताळणे शक्य होईल. लोकांनी सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास निश्चित मदत होणार असून अधिक कडक निर्बंध लागू करण्याची वेळ येणार नाही, असे श्री शिंदे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या लाटेचा सामना करण्याची आपली सज्जता झाली असली तरीही एक टीम बनून आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे, असेही त्यांनी यावेळी सर्व मनपा आयुक्तांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबईचे मनपा आयुक्त अभिजित बांगर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर शिंदे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, उल्हासनगर मनपाचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी अंबरनाथचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, बदलापूरचे मुख्याधिकारी सुनील गोडसे, ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंग, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.