बदलापूरमध्ये डॉक्टरला यूपी एटीएसने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:45 IST2025-08-05T10:44:45+5:302025-08-05T10:45:17+5:30
उत्तर प्रदेश एटीएसकडून देशविघातक कृत्यांवर नजर ठेवली जात होती...

बदलापूरमध्ये डॉक्टरला यूपी एटीएसने घेतले ताब्यात
बदलापूर : उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने बदलापूर शहरातून ‘सिमी’ या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ओसामा शेख या होमिओपॅथिक डॉक्टरला ताब्यात घेतले. त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. त्याला घेऊन पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. ओसामा शेख हा बदलापूर पूर्वेकडील एका खासगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता.
उत्तर प्रदेश एटीएसकडून देशविघातक कृत्यांवर नजर ठेवली जात होती. यामध्ये ४०० सदस्य असलेल्या एका पाकिस्तानी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उत्तर प्रदेशातला एक मोबाईल नंबर समाविष्ट असल्याची माहिती मिळाली. हा नंबर वापरणाऱ्या अजमल अली याला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतल्याने आपण पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात असल्याची कबुली दिली.
अजमल अलीने इंस्टाग्रामवर एका व्यक्तीला आपला गुरू आणि मेंटॉर मानत असल्याचे सांगितले. अजमलचा गुरू म्हणजेच बदलापूरचा डॉ. ओसामा शेख असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले. ओसामा हा अजमल अली याच्याप्रमाणे अनेकांशी इंस्टाग्राम आणि ॲपद्वारे संपर्कात राहून देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत होता.
डॉ. शेख हा बदलापूर गावातील ईदगाह मैदानाजवळ राहत असून त्याने बदलापूरमध्ये आणखी कुणाकुणाचे ब्रेन वॉश केले? याचा तपास सुरू आहे.