अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 09:15 IST2025-12-17T09:08:51+5:302025-12-17T09:15:07+5:30
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसांवर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळकेर यांच्या कार्यालवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आता शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या प्रकरणामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर हे प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातील सदस्य असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिंदे सेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचे पुत्र निखिल वाळेकर यांच्या विरोधात त्याचाच चुलत भाऊ पवन वाळेकर हा निवडणूक रिंगणात आहे. या निवडणुकीत वाळेकर कुटुंबातील झालेली फाटाफूट आणि भाजप आणि शिंदे सुरू झालेली चढाओढ आता वेगळ्याच वळणावर गेली आहे.
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
अंबरनाथ पश्चिम भागातील घाडगेनगर भागातील शिव मंदिर परिसरात पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर रात्री बारा वाजताच्या दरम्यान दोन हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. फायरिंग झाल्याचे लक्षात येताच पवन वाळेकर यांचे अंगरक्षक बाहेर आले आणि त्यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पाठलाग देखील केला. मात्र हे दोन्हीही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, रात्री उशिरा अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या पवन वाळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिया आंदोलन केले.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेच्या आदल्या रात्री अंबरनाथ शहरात भाजपाच्या उमेदवारावर गोळीबाराची घटना घडत असल्यामुळे वातावरण आणखीनच गढूळ झाले आहे.
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालवर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/atqnIyaMmB
— Lokmat (@lokmat) December 17, 2025