विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?
By Admin | Updated: June 30, 2017 02:41 IST2017-06-30T02:41:11+5:302017-06-30T02:41:11+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.

विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. आता या केंद्राचा शुभारंभ जुलैमध्ये होणार आहे. विद्यापीठाकडून शुभारंभाची आश्वासने पाळली जात नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
कल्याण उपकेंद्राची इमारत बांधून झाल्याने ते सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंकडे माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगले यांनी केली होती. या मागणीपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यावर, उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जून संपत आला तरी हे केंद्र सुरू झालेले नाही. कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत, देवळेकर यांना विचारले असता, त्यांनी कुलगुरूंना फोन लावला. मात्र, रेंजअभावी त्यांच्याशी संभाषण झाले नाही.
उपकेंद्राचा मुद्दा २००५ पासून गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रा. इंगळे हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. विद्यापीठाने ठाण्यातील उपकेंद्र सुरूही केले. कल्याणच्या उपकेंद्राच्या उभारणीत विद्यापीठाकडूनच दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विद्यापीठाने उपकेंद्रासाठी सुरुवातीला एक कोटीची तरतूद केली होती. महापालिकेने उपकेंद्रासाठी गांधारे येथील जागा नाममात्र भाडेतत्त्वावर दिली. त्याच्या बदल्यात केवळ एक रुपया घेतला होता. जागा दिल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने शिवसेना सदस्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर, उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. हे उपकेंद्र दोन टप्प्यांत बांधले जाणार आहे. दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी २० कोटी याप्रमाणे ४० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करून तळ अधिक एक मजला अशी २५ खोल्यांची इमारत उभी राहिली आहे. ही इमारत शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. याठिकाणी एम-टेकची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाचे केंद्र सुरू केले जाणार आहे. कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भागांतील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याऐवजी कल्याणमध्ये ही सुविधा मिळणार आहे.
जूनमध्ये हे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे निकाल लागले आहेत. अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणचे उपकेंद्र उपयुक्त ठरले असते. आता प्रवेशप्रक्रिया संपल्यावर उपकेंद्राचा शुभारंभ होऊन फायदा होईल का, याविषयी साशंकता आहे.