उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:16 IST2025-11-03T19:15:40+5:302025-11-03T19:16:44+5:30
Ulhasnagar Municipal Corporation Election: वधारियाच्या इशाऱ्याने भाजप विरुद्ध कलानी असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली. ओमी कलानी यांनी यापूर्वी भाजपा मुक्त शहर असा नारा दिला होता.

उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
Ulhasnagar Municipal Corporation Election News: उल्हासनगर शहरातील टाऊन हॉल येथे रविवारी रात्री पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपचे शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी महापालिका कलानी मुक्त करणार असल्याचा इशारा दिला. वधारियाच्या इशाऱ्याने भाजप विरुद्ध कलानी असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली. ओमी कलानी यांनी यापूर्वी भाजपा मुक्त शहर असा नारा दिला होता.
उल्हासनगरातील टाऊन हॉलमध्ये रविवारी भाजपा पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.
यावेळी महापालिका निवडणुकीत सत्तेचा झेंडा भाजपच्याच हाती फडकणार असल्याचे वातावरण भाजपा स्थानिक नेत्यांनी बनविले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, टीओके, समाजवादी पक्ष, उद्धवसेना आदी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती शहराध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली. यावेळी महापालिकेला कलानी मुक्त करणार असल्याचे वक्तव्य वधारिया यांनी केल्याने, भाजपा विरुद्ध कलानी असा संघर्ष निवडणुकीत निर्माण होणार आहे.
ओमी कलानी टीमचे पदाधिकारी राहिलेले ब्रिजेश श्रीवास्तव, उर्मिला गुप्ता, हीरो रामचंदानी, समाजवादी पक्षाचे अमरसिंह यादव, वाल्मीकि संघटनेच्या बाला मां मरोठिया, उर्मिला रॉय, विनोद कथोरिया, कार्तिक बहनवाल, मोहित धिंगान, तुषार चव्हाण, राष्ट्रवादीचे अखिलेश श्रीवास्तव, आर.पी. गुप्ता, रंजना सोमनाथ यादव, पवन रॉय, पूनम अजीत गुप्ता, फैजान शेख, मनोज बनिया, ॲड. रुक्मिणी पांडे, सुचित्रा सुधीर सिंह यांच्यासह अन्य जणांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी भाजपचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.